पुणे-संगीत रंगभूमीवर गायन व अभिनय याद्वारे संगीत नाटक परंपरा चालू काळातही जिवंत ठेवण्याचे मोठे कार्य कीर्ती शिलेदार यांनी केले आहे. त्यांच्या संपूर्ण संगीत नाटक कार्याची ओळख तरुण पिढीला ‘मम सुखाची ठेव’ या चित्रफितीद्वारे होईल, त्यादृष्टीने कीर्ती शिलेदारांबरोबरच या चित्रफितीच्या निर्माती, संकलक व दिग्दर्शिका दीप्ती भोगले यांचे मी अभिनंदन करतो. कीर्ती शिलेदार म्हणजे शास्त्रीय संगीताची सुरेल विश्लेषक, अभ्यासक आहेत. कीर्ती ही व्यक्ती नसून, संस्था आहे. कारण तिने आपल्याच कामाचे, गायनाचे सुरेख विश्लेषण केलेले आहे. त्यांच्या संपूर्ण सांगीतिक प्रवासात बारकावे टिपणे हा त्यांचा अभ्यासातून आलेला गुण आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी आज काढले. पुणे नवरात्रौ महोत्सवात संगीत रंगभूमी समृद्ध करणार्या कीर्ती शिलेदार यांच्या साठ वर्षांच्या वाटचालीवर आधारित दीप्ती भोगले यांनी निर्मिती, संकलन व दिग्दर्शन केलेली ‘मम सुखाची ठेव’ या चित्रफितीचे प्रकाशन डॉ. पटेल यांच्या हस्ते पत्रकार भवन येथील कार्यक्रमात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर डॉ. जब्बार पटेल यांजसमवेत ‘संवाद’चे अध्यक्ष सुनील महाजन, कीर्ती शिलेदार, दीप्ती भोगले, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार व पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.