जुन्नरला ऐन शिवजयंतीच्या तोंडावर प्रशासनाची भंबेरी
जुन्नर (वार्ताहर)
किल्ले शिवनेरी रस्त्यावरील पंचलिंग चौकातील शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ हायड्रोलिक शिडी(यांत्रिक उद्वाहक )बसण्यास प्रशासनाने अटकाव केला .त्यामुळे तेथे मोठा तणाव निर्माण झाला .
जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांच्या समर्थकांनी पुतळ्याजवळ ठिय्या केल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली .आज सायंकाळी साडेपाच नंतर हा प्रकार घडला . ही माहिती समजताच नारायणगाव चे सरपंच बाबू पाटे,विघ्नहरचे कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे आदींसह कार्यकर्ते येथे जमा झाले
.दरम्यान हायड्रोलिक शिडी बसविण्यास कोणतीही शासकीय परवानगी नसल्याने बसवता येणार नाही ,असा पवित्रा नगरपालिका प्रशासनाने घेतला .
त्यामुळे या वादाला तोंड फुटले .दरम्यान पोलिस प्रशासनाने तातडीने कुमक बोलावून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले .
जुन्नरमध्ये लोकवर्गणी जमा करून सुमारे चार लाख रुपये खर्च करत कार्यकर्त्यांनी १५ फुटी हायड्रोलिक शिडी तयार करून घेतली आहे .याबाबत त्यांनी सौं.बुचके यांच्या माध्यमातून ११ फेब्रुवारीला नगरपालिकेला पत्र दिले .त्यावेळी लगेचच शिडी बसविण्यात येऊ नये असे पत्र प्रशासनाने त्यांना दिले होते .
दरम्यान हा विषय सौ.बुचके आणि त्यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकार्यांकडे घेऊन याबाबत दाद मागितली. त्यासाठी त्यांनी दिलेल्या पत्रावर जिल्हाधिकार्री कार्यालयाकडून उद्वाहक शिडी बसवण्यासाठी नगरपालिकेला आदेश देता येणार नाही असे कळवले होते
वर्षानुवर्ष शिवरायांना हार घातला जात नाही याचा खेद..
शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यास दोन दशके उलटून गेली .मात्र एकही मुख्यमंत्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालू शकला नाही .त्यामुळे लोकवर्गणीतून बनवून ही सुविधा करण्याचा कार्यकर्त्यांना प्रयत्न होता.ही शिडी कायमस्वरूपी ( पर्मनंट)नसतानाही बसवून दिली जात नसेल तर आंदोलन करणारच.
कायमस्वरूपी
शिडी बसवणार नसल्याचे पूर्वीचे पत्र …
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ कायमस्वरूपी शिडी बसवणार नाही असे पत्र २००१ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष विकास खोपे आणि मुख्याधिकारी आर .आर.चव्हाण यांनी गृहखात्याला दिले आहे .त्यामुळे शिडी बसण्यासाठी यापुढे प्रशासन परवानगी देऊ शकत नाही .
- –डॉ. जयश्री काटकर (मुख्याधिकारी जुन्नर )