माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना ‘पद्मा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर
महेश लांडगे यांना ‘पद्मा युवा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’
पुणे : पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘पद्मा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’ यंदा देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना, तर ’पद्मा युवा संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार’ भारतीय जनता पक्ष पुरस्कृत आमदार महेश लांडगे यांना जाहीर झाला आहे.
रविवार, दि. 9 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी 7 ते 10 या वेळेत गणेश कला क्रीडामंच, स्वारगेट, पुणे येथे हा पुरस्कार सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून ऑल इंडिया अॅन्टी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष मनिंदरसिंग बिट्टा, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले, पुण्याचे पालकमंत्री गिरीशजी बापट, राज्यमंत्री दिलीपभाऊ कांबळे, खासदार श्रीरंगअप्पा बारणे व पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक उपस्थित राहणार आहेत.
ज्या व्यक्तींनी संघर्षातून आपले आयुष्य घडवले, अशा व्यक्तिंना पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीतर्फे हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा पुरस्काराचे आठवे वर्ष असून, खडतर परिस्थितीचा सामना करीत पुढे आलेल्या प्रतिथयश व्यक्तींचा सत्कार करुन युवकांपुढे आदर्श निर्माण करण्याचा उद्देश या पुरस्कारामागे आहे.
या पुरस्कार प्रदान सोहळ्याबरोबरच ‘युवकांच्या मनातील उद्याचा महाराष्ट्र’ या विषयावर राज्यातील युवानेत्यांचा परिसंवाद आयोजिला आहे. राज्याचे कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार डॉ. विश्वजीतजी कदम, आमदार संतोषजी दानवे, आमदार राहुलदादा कुल, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहितदादा पवार हे युवानेते सहभागी होत आहेत. यासह संगीतसम्राट फेम अभिजित कोसंबी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
अशी माहिती पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे, सल्लागार समितीचे जवाहर चोरगे, ऍड. मंदार जोशी व निखिल निगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.