महिलांसाठीच्या उल्लेखनीय कार्याबद्दल रितू प्रकाश छाब्रिया यांना पुरस्कार
पुणे : महिलांच्या शाश्वत विकासासाठी विविध उपक्रमांद्वारे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा रितू प्रकाश छाब्रिया यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘फ्लो’च्या मावळत्या अध्यक्षा हरजिंदर कौर तलवार यांनी त्यांचा सन्मान केला. छाब्रिया यांनी अध्यक्षपदाच्या कालावधीत (२०१९-२०) उस्मानाबाद जिल्ह्यातील १०० विधवा शेतकरी महिलांना बियाणे आणि शेतीचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवले.
शेतकरी आत्महत्या या सामाजिक प्रश्नावर लक्ष्य देऊन विधवा शेतकरी महिलांना उभे करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांना कौशल्याचे प्रशिक्षण, जमिनीची मालकी मिळवण्यात मदत आणि नियमित बियाण्यांचा पुरवठा केला जात आहे. यातील ६० टक्के महिला उत्तम शेती करत आहेत. त्यातून त्यानी त्यांच्या कर्जाची परतफेड केली आहे. तर जवळपास ८० टक्के महिला शेतकरी उत्साहाने शेती करत आहेत. नफ्यातील शेती करण्यासह बाजारांमध्ये उत्पादन नेण्याची आणि विकण्याची कला त्यांना अवगत झाली आहे. ८० ते ९० लाखांचे कृषीउत्पादन या महिलांनी घेतले आहे. हा उपक्रम कायमस्वरूपी चालू राहावा, यासाठी पुढील दोन वर्षांकरिता निधी वर्ग केलेला आहे, असे रितू छाब्रिया यांनी नमूद केले.