पुणे : “स्थानिक पातळीवरील संवादासाठी कम्युनिटी रेडिओ खूप उपयुक्त ठरतो. आपत्ती व्यवस्थापन, तसेच आपत्ती टाळण्यासाठी हॅम व कम्युनिटी रेडिओची भूमिका महत्त्वाची आहे. प्रबोधन, समुपदेशन, शिक्षण, सहभाग, संवाद यासाठी प्रभावी माध्यम म्हणून कम्युनिटी रेडिओचे महत्व आहे,” असे मत सुजाता कोडग यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्सची संस्था (आयईटीई) आणि पुणे हॅम रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने रेडिओ दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘आपत्ती व्यवस्थापनात रेडिओची भूमिका’ या विषयावर सुजाता कोडग यांचे व्याख्यान झाले. एरंडवणा परिसरातील ‘आयईटीई’मध्ये झालेल्या या कार्यक्रमास विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, शशी भाटे, तातुगडे, दिपाली आकोलकर, विलास रबडे, डॉ. दत्ता देशकर, विश्वास काळे, किशोर शेंडे, व हॅम श्रीपाद कुलकर्णी, दिलीप बापट आदी उपस्थित होते.
सुजाता कोडग म्हणाल्या, ”एखादी मोठी आपत्ती आल्यावर इतर सर्व यंत्रणा, नेटवर्क बंद पडतात. त्यावेळी हॅम व कम्युनिटी रेडिओ सुरू असतात. यांची मदत संकटकाळी होती. यासह मनोरंजनात्मक आणि प्रबोधनपर कार्यक्रमातून जनजागृती करू शकतो. या माध्यमाचा अधिकाधिक वापर व्हायला हवा. रेडिओच्या सहाय्याने नेमकी, खरी आणि अद्ययावत माहिती समजण्यास मदत होते.”
डॉ. दत्ता देशकर म्हणाले, “जलसाक्षरता करण्याच्या हेतूने गेल्या २० वर्षापासून रेडिओच्या माध्यमातून काम करत आहे. दीड वर्षांपूर्वी रेडिओ जलसंवाद हा वेब रेडिओ सुरू केला. शेतकरी, विद्यार्थी यांच्यासह अनेक क्षेत्रात लोकांपर्यंत रेडिओ पोहचला आहे. खूप मोठ्या प्रकारे मदत होत आहे.” विविध काळातल्या ४५ रेडिओचे अलिबाग मधील संग्राहक दिलीप बापट यांनी त्यांचे रेडिओविषयीचे आकर्षण आणि छंदाविषयीचा प्रवास मनोरंजकतेने उलगडून सांगितला. ते म्हणाले, “रेडिओ आता नामशेष होत आहे, असे बऱ्याच लोकांना वाटते. परंतु अजूनही रेडिओ जिवंत आहे आणि नेहमीच राहील.”
राजेंद्रकुमार सराफ म्हणाले, ”रेडिओ हे मनोरंजन आणि प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. त्यावर सर्व वयोगटातील लोकांसाठी कार्यक्रम असतात. त्यामुळे अबालवृद्ध रेडिओशी जोडले गेले आहेत. वैविध्यपूर्ण विषयांवरील कार्यक्रम हे त्याचे वैशिष्ट्य आहे.” ‘रेडिओ : काल, आज आणि उद्या’ या विषयावर विश्वास काळे यांनी मार्गदर्शन केले. विलास रबडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला रेडिओप्रेमींनी उपस्थिती लावली.