पुणे : आरोग्यवर्धिनी चिकित्सालय आणि कायायुर्वेद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजी आणि ट्रायकोलॉजी’वर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (दि. १६) सकाळी ९ ते ५ या वेळेत पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे हे चर्चासत्र होणार आहे. केरळ येथील आयुर्वेदिक केश व त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. गोपाकुमार, दुबई येथील सौंदर्यशास्त्र तज्ज्ञ डॉ. व्ही. एल. शाम व ‘केशायुर्वेद’चे संस्थापक आयुर्वेदाचार्य वैद्य हरीश पाटणकर सौंदर्यशास्त्र, केशविकार व उपचार आदी गोष्टींवर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी वैद्य हरीश पाटणकर संकल्पित त्वचारोग, सौंदर्य, अनावश्यक केस, सौंदर्यशास्त्र यावर भाष्य करणाऱ्या ‘कायायुर्वेद’चे प्रकाशन अभिनेते विजय पटवर्धन यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. दुबई येथे होऊ घातलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय आयुष परिषद आणि प्रदर्शनाच्या पूर्वी होत असलेल्या या चर्चासत्रातून ज्ञानात भर पडणार आहे. तसेच १६ ते १९ फेब्रुवारी २०२० या कालावधीत प्राचीन संहिता गुरुकुल निवासी शिबीर होणार आहे, अशी माहिती वैद्य स्नेहल पाटणकर यांनी दिली आहे.