पुणे : “महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य यासह शेतकऱ्यांसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या फिक्की फ्लो संस्थेचे सामाजिक कार्य प्रभावित करणारे आहे. या व्यासपीठावरून माझ्या हस्ते मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान केली, याचा मला आनंद आणि माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मुलींच्या चेहऱ्यावर फुललेल्या स्मित हास्याने मला प्रोत्साहन मिळाले. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे असून, त्यासाठी ‘फिक्की फ्लो’सारख्या संस्था प्रयत्नशील आहेत, याचा आनंद वाटतो.” असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी सिंग धोनी यांनी केले.
साक्षी सिंग धोनी; ‘फिक्की फ्लो’कडून कृषी-नर्सिंगच्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती जाहीर
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या लेडीज ऑर्गनायझेशन अर्थात फिक्की फ्लो संस्थेच्या वतीने साक्षी सिंग धोनी यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते. इंदिरा कॉलेजचे संचालक चेतन वाकळकर यांनी साक्षी यांची मुलाखत घेतली. यावेळी कृषी विद्यालयामार्फत सहा बीएससी (कृषी), तर लीला पुनावाला फाउंडेशनमार्फत चार बीएससी (नर्सिंग) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात काहीजणींना प्रदान करण्यात आली. ‘फिक्की फ्लो’च्या अध्यक्षा रितू प्रकाश छाब्रिया, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, ‘फ्लो’च्या सदस्या अनिता सणस आदी उपस्थित होते. शिष्यवृत्तीची रक्कम साक्षी धोनी यांच्याकडून स्वीकारताना भारावून गेल्या होत्या.
रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “गेल्या पाच वर्षात ‘फिक्की फ्लो’ पुणे चॅप्टरने भरीव कामगिरी केली असून, महिला सक्षमीकरणाचे अनेक उपक्रम राबवले आहेत. शहरातून खेड्याकडे ही यावर्षीची मध्यवर्ती कल्पना आहे. समाजाच्या सर्व स्तरांतील महिलांच्या आयुष्याचा स्तर उंचावणे, त्यांच्या हातांना काम देणे, त्यांना सशक्त करणे, रोजगार देणे ही त्यामागची उद्दिष्टे आहेत. गेल्याच महिन्यात पुणे चॅप्टरने आयोजिलेल्या ‘फ्लो हाल्फ मॅरेथॉन’मधून महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांकरिता ५१ लाख रुपयांचा निधी उभा केला. त्यातून अनेक उपक्रम येत्या काळात राबवले जाणार आहेत.” डॉ. प्रमोद रसाळ यांनी विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देऊन शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल ‘फिक्की फ्लो’चे कौतुक केले.