सावित्रीबाई फुले पुरस्काराने हर्षदा देशमुख यांचा गौरव
ड्रीम सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य
पुणे : ड्रीम सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून माण-खटाव तालुक्यात सामाजिक कार्य उभारणाऱ्या, तसेच केजे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे काम करणाऱ्या हर्षदा देशमुख-जाधव यांचा सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरव करण्यात आला. राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि राजर्षि शाहूमहाराज सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या कार्यक्रमात ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर व वरिष्ठ पत्रकार शीतल पवार यांच्या हस्ते हर्षदा देशमुख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राजमाता जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने संभाजी ब्रिगेडच्या वतीने आदर्श मातांचा सन्मान करण्यात आला. हर्षदा देशमुख यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार, तर मुक्त पत्रकार सायली नलवडे-कवीटकर यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते गोपाळ तिवारी, माजी महापौर कमल व्यवहारे, मराठा सेवा संघाचे मारुतीराव सातपुते, मराठवाडा महाविद्यालयाचे प्राचार्य सारंग एडके, जिजाऊ ब्रिगेडच्या अमृता मगर, माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे आदी उपस्थित होते.
प्रभाकर देशमुख युवामंच आणि ड्रीम सोशल फ़ाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातला शेतकरी सुखी व्हावा, तेथील दुष्काळ, बेरोजगारी दूर व्हावी, शिक्षण, स्पर्धापरिक्षा, उद्योग व आरोग्य चांगले व्हावे यासह तरुणांच्या समस्या व ग्रामीण महाराष्ट्राच्या आव्हानांवर मात करण्यासाठी हर्षदा देशमुख-जाधव प्रयत्न करीत आहेत. तसेच केजे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आणि कौशल्याभिमुख शिक्षण देण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हर्षदा राबवत आहेत.