‘मेंदूची गुपिते’ पोस्टर प्रदर्शन स्पर्धेत बालशिक्षण मंदिर प्रथम, ज्ञानप्रबोधिनी द्वितीय
पुणे : मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘मेंदूची गुपिते’ या विषयावर घेण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शन स्पर्धेत मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिर शाळेला प्रथम क्रमांक व कै. सीताबाई भिकू लांडे स्मृती चषक मिळाला. ज्ञानप्रबोधिनी शाळेला दुसरा, तर दादासाहेब नाटेकर माध्यमिक विद्यालय, चिखलीला तिसरा क्रमांक मिळाला. जिल्हा परिषद शाळा, मालखेड यांना विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. या स्पर्धेचे बक्षिस वितरण येत्या मंगळवारी (१७ सप्टेंबर) संध्याकाळी ५.०० वाजता दि इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, शिवाजीनगर पुणे येथे होईल. या स्पर्धेत एकूण १३ शाळांनी सहभाग घेतला होता.
आपला शहाणपणा, आपल्या भावना, आपल्या हालचाली, आपले हावभाव मेंदूमुळे निर्माण कसे होतात? आपल्या समजुती, आपले ज्ञान, आपले चिंतन आपला मेंदू कसे घडवून आणतो? शरीराचा व्यायाम असतो तसा मेंदूचा व्यायाम करता येऊ शकतो का? या प्रश्नाची उत्तरे विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना समजावून दिली. आयसर, पुणे येथील वैज्ञानिक डॉ. निशिकांत सुभेदार आणि मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.