पुणे : जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या १९ वर्षाखालील मुला व मुलींच्या तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सूर्यदत्ता पब्लिक स्कूलच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकविला आहे. ही स्पर्धा राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार, आंबोली येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत १९ वर्षाखालील मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात सूर्यदत्ता पब्लिक स्कूलच्या संघाने इंडस इंटरनॅशनल संघाच्या संघाचा, तर १९ वर्षाखालील मुलींच्या गटात राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेच्या संघाचा पराभव करत अव्वल क्रमांक पटकविला. मुलांच्या गट शार्दूल शिंदे, तनिस्क पाहावा व नीलब्जो पाल यांचा, तर मुलींच्या संघात ख़ुशी भिसे, वैष्णवी औरंगाबादकर व श्रावणी कुलकर्णी यांचा समावेश आहे.
सुर्यदत्ता पब्लिक स्कूलच्या १९ वर्षाखालील मुलांच्या गटाने मागील तीन वर्षापासून या स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखले आहे. सदर संघाची जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दोन्ही संघाना इन्स्टिट्यूटचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. निशिगंधा पाटील आणि प्रा. संकेत नालकर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया आणि उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांनी दोन्ही संघाचे अभिनंदन केले.