इंडो-युएई बिझनेस अॅन्ड सोशल फोरमचा ‘वर्ल्डस ग्रेटेस्ट ब्रँड अवॉर्ड’
पुणे : जागतिक दर्जाचे गुणवत्तापूर्ण, मुल्याधिष्ठित आणि कौशल्याधारित शिक्षण देणारी संस्था अशी ओळख असलेल्या पुण्यातील सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सला इंडो-युएई बिझनेस अॅन्ड सोशल फोरमतर्फे (आययुएईबीएसएफ) देण्यात येणार्या ‘वर्ल्डस ग्रेटेस्ट ब्रॅन्ड अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. नुकत्याच दुबई येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे यंदा चौथे वर्ष आहे.
‘आययुएईबीएसएफ’च्या वतीने आयोजित समिटमध्ये या पुरस्कारांचे वितरण दुबईतील जपानचे कॉन्सुल जनरल डॉ. अकिमा उमेझावा, जिबुती देशाचे राजदूत ओस्मान मौसा दरार यांच्या हस्ते करण्यात आले. अदानी उद्योग समुहाचे संचालक विनोद अदानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एकूण 16 प्रकारच्या उद्योग क्षेत्रांचे 300 पेक्षा अधिक प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते. विविध प्रवर्गातील 100 ब्रँडचा सन्मान यावेळी करण्यात आला. आशियातील उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी, तसेच शिक्षण, व्यापार, तंत्रज्ञान यावर मंथन करण्यासाठी ‘आधुनिक काळात जागतिक व्यापार-व्यावसायाच्या संधी आणि धोके’ व ‘2030 मधील शिक्षण : आधुनिक तंत्रज्ञान वेगाने प्रगती करण्यास पूरक की सर्वांगीन विकासातील अडथळा’ या दोन विषयांवर चर्चासत्र झाले. यामध्ये वेगवेगळे व्यवसाय, शिक्षण आणि तंत्रज्ञान याविषयी तज्ज्ञांनी चर्चा केली.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “गेल्या 20 वर्षांत सुर्यदत्ता ग्रुपने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासाला प्राधान्य दिले आहे. शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा, औद्योगिक क्षेत्राशी समन्वय, शिकवण्यातील नाविन्यता, प्राध्यापकांतील कौशल्य विकास, क्रयशीलतेला चालना, इनोव्हेशनवर भर यामुळे दर्जेदार शिक्षण देण्यात आम्हाला यश आले आहे. जागतिक दृष्टिकोनातून मुल्याधिष्ठित शिक्षण देत शाश्वत विकास आणि समकालिन दृष्टिकोन ही आमची वैशिष्ट्ये आहेत. शिक्षण क्षेत्रातील या योगदानाबद्दल देश-विदेशातील अनेक नामांकित संस्थांनी सन्मानित केले आहे. आजच्या पुरस्काराने त्यात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.