बोपोडीत खास महिलांसाठी ‘रोजा इफ्तार’
नगरसेविका सुनीता वाडेकर यांच्या पुढाकारातून दरवर्षी होते आयोजन
पुणे : मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून, उपवास सोडण्यासाठी सोमवारी बोपोडीत खास महिलांसाठी ‘रोजा इफ्तार’चे आयोजन करण्यात आले होते. सर्वधर्मियांचे धार्मिक प्रसंग एकत्र साजरे करून सलोखा वाढविण्याच्या उद्देशाने नगरसेविका सुनीता वाडेकर व आरपीआय नेते परशुराम वाडेकर मित्र परिवाराच्या वतीने या रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. जवळपास १५० महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
बोपोडीतील पठाण चाळीत असलेल्या शहाबुद्धीन काझी निवासात या रोजा इफ्तारचे आयोजन केले होते. यावेळी सुनीता वाडेकर यांनी मुस्लिम भगिनीना घास भरवत त्यांचा उपवास सोडला. खजूर, फळे, ज्यूस, अंगुरमलाई, चिकन बिर्याणी आदी रुचकर पदार्थांचा आस्वाद उपस्थितांनी घेतला. प्रसंगी परशुराम वाडेकर, शहाबुद्दीन काझी, विजय सोनिगरा, फातिमा करीम खान, डॉ. तरन्नूम परकुटे, नजमा काझी, हिना काझी, शमीम शेख, इरफाना शेख, अरुणा सोनिगरा, नंदा निकाळजे, राजश्री कांबळे, फारूक शेख, बाबा शेख, सादिक शेख, समीर मण्यार आदी उपस्थित होते.
‘देशाला सर्वधर्म एकत्र, सलोख्याने राहण्याची आवश्यकता आहे. मुस्लिम समाजाच्या या पवित्र महिन्यात त्यांच्या सणात आपणही सहभागी आनंद घेतला पाहिजे. सामाजिक सलोखा वाढण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वपूर्ण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बोपोडी भागातील मुस्लिम भगिनींसाठी रोजा इफ्तारचे आयोजन केले जाते, असे नगरसेविका सुनीता वाडेकर यांनी नमूद केले.