लेखापालन क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध -सीए चंद्रशेखर चितळे
पुणे : सनदी लेखापाल झाल्यानंतर नोकरी, स्वतंत्र व्यवसाय आणि इतर अनेक क्षेत्रात काम करता येते. लेखापालन क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कठोर मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर ‘सीए’सारख्या आव्हानात्मक परीक्षेत यश संपादन करू शकतो,” असे मत ज्येष्ठ सनदी लेखापाल आणि दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांनी व्यक्त केले.
आयसीएआय पुणे शाखा आणि वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन (डब्ल्यूआयसीएएसए-विकासा) पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आयोजित ‘सीए करिअर काउंसलिंग’ कार्यक्रमात ते बोलत होते. बीएमसीसी रस्त्यावरील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या काळे सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत आयसीएआयच्या पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे, उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे, सीए समीर लड्डा यांनी मार्गदर्शन केले. मोठ्या संख्येने पालक व दहावी-बारावी उत्तीर्ण, परीक्षा दिलेल्या आणि सीए होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला उपस्थिती लावली.
सीए ऋता चितळे म्हणाले, “कला, वाणिज्य, विज्ञान या कोणत्याही शाखेचा विद्यार्थी सनदी लेखापाल ची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो. सनदी लेखापाल साठीची परीक्षा अवघड असते हा विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनातील एक गैरसमज आहे. सीए वाणिज्य व्यापाराच्या सर्व मार्गांमध्ये सेवा देऊ शकते. त्यासाठी लागणार अभ्यासक्रम आणि संरचना, परीक्षांची माहिती आपण समजून घ्यावी.”
सीए संकेत शहा, सीए श्वेता पुजारी, सीए पुष्कराज बेडेकर, सीए रिद्धी चांडक, सीए शीतल धूत यांनी कारशालेत मार्गदर्शन केले. सीए बनण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टी, अभ्यासक्रम, या सर्व गोष्टी पॉवर-पॉईंट सादरीकरनाद्व्यारे दाखविल्या. तसेच सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ‘विकासा’कडून नियमित उपक्रम, सेमिनार, परिषदा, मूलभूत कोर्सेसची देखील माहिती या मार्गदर्शन शिबिरात देण्यात आली. खडतर प्रयत्न करून, कौटुंबिक संकटाना सामोरे जाऊन सीए झालेल्या विद्यार्थ्यांची उदाहरण देखील देण्यात आले.