मोहिनी घालणाऱ्या गायन-वादन-नृत्याचा मिलाफ
पुणे : वाचस्पतीसारखा फार ऐकायला न मिळणाऱ्या रागातून, बागेश्रीमधल्या तराण्यातून आणि संत कबीरांच्या ‘चादरिया जीनी जीनी रे’ भजनातून अमोल निसळ यांच्या सुरावटींनी मोहिनी घातली. या मनमोहक गायन मैफिलीनंतर उत्तरार्धात पंडित विजय घाटे, कथ्थक नृत्यांगना शीतल कोलवालकर यांच्या गायन-वादन-नृत्य मिलाफाच्या बरसातीने रसिक श्रोते न्हाऊन निघाले.
स्वरनिनादतर्फे सहकारनगर येथील मुक्तांगण बालरंजन केंद्रात आयोजित ‘गंगाधर स्वरोत्सवा’च्या दुसऱ्या दिवशी अमोल निसळ यांच्या गायनाने आणि पंडित विजय घाटे, श्रीधर पार्थसारथी व शीतल कोलवालकर यांच्या तालवाद्य कचेरीने श्रोत्यांना स्वरसंध्येची अनुभूती दिली. याप्रसंगी स्वरनिनाद संस्थेच्या संचालिका वृषाली निसळ, ऍना कंस्ट्रक्शनचे अल्पना व अर्चिस अन्नछत्रे, प्रीतम इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रीतम मंडलेचा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पंडित गंगाधर बुवा पिंपळखरे यांचे शिष्य युवा गायक अमोल निसळ यांनी वाचस्पती रागातील ‘साचो तेरो नाम’ आणि ‘चतुर सुगर बलमा’ या दोन बंदिशी सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. रागाची शुद्धता राखून गायनात सौंदर्य कसे आणता येईल, याचा उत्तम नमुना अमोल निसळ यांनी वाचस्पती रागातून दाखवला. बागेश्री रंगात खास पतियाळा घराण्याची साक्ष देणारा एक तराणा गात रसिकांची वाहवा मिळवली. राग संगीत आणि भजन गाताना आवाजातील सूक्ष्म बदल कसे असावेत, याचे दर्शन अमोल निसळ यांच्या गायतनातून अनुभवायला मिळाले. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव, संवादिनीवर राहुल गोळे, तानपुऱ्यावर ऋषिकेश सोमण व विनय चित्राव यांनी साथसंगत केली.
उत्तरार्धात, पंडित विजय घाटे यांच्या कल्पनेतून साकारलेली तालवाद्य कचेरी सादर झाली. त्यात पंडित घाटे यांच्या तबलावादनासह शीतल कोलवलकरांचे मोहक नृत्य, सुरंजन खंडाळकरांचे गायन आणि श्रीधर पार्थीसारथी यांचे मधुर मृदूंगवादन सादर झाले. बंदिशी, कायदे आणि ताल याला श्रोत्यांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांना मिलिंद कुलकर्णी यांनी संवादिनीवर, तर सागर पाटोळे यांनी पढनवर तितकीच अनुरूप साथसंगत केली.
स्वरनिनाद ही संस्था भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन आणि प्रसारासाठी कार्यरत असून, पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी ‘गंगाधर स्वरोत्सवा’चे आयोजन केले जाते. यंदा हा स्वरोत्सवाचे चौथे वर्ष आहे, असे स्वरनिनाद संस्थेच्या वृषाली निसळ यांनी नमूद केले. निवेदन मधुरा ओक-गद्रे यांनी केले.