पुणे-खोटा इतिहास सांगून, चुकीची माहिती पसरवून समाजात हिंसाचाराची बिजे पसरवणाऱ्या डाव्या प्रवृत्तींचा घातक चेहरा समाजाने समजून घ्यावा लागेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी शनिवारी केले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या ‘ डाव्यांचा खरा चेहरा ‘ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात श्री. दीक्षित बोलत होते. विवेक विचार मंच चे अध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.परममित्र प्रकाशन ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
श्री दीक्षित म्हणाले की, दलीत, उपेक्षित, वंचित, अल्पसंख्याक, कामगार आदी वर्गाच्या कल्याणाची भाषा करणारे डावे प्रत्यक्षात मात्र याच्या विरुद्ध वर्तन करायचे. चीन, रशिया या देशात हिंसक क्रांती घडवून सत्ता काबीज करणाऱ्या डाव्यांनी या वर्गाचे काय कल्याण केले हे दिसलेच आहे.
सत्ता काबीज करून भ्रष्टाचार करणे हाच डाव्यांचा खरा चेहरा आहे.हा चेहरा लोकशाही व्यवस्थेपुढे कोणता धोका उभा करतो, हे नक्षलवादी चळवळीतून देशाने अनुभवले आहे. वनवासिंच्या उद्धाराची भाषा करत नक्षलवाद्यांनी आपले अर्थकारण चालविले आहे.डाव्यांचा हा खरा चेहरा समजून घेण्यासाठी श्री.भांडारी यांचे पुस्तक उपयुक्त असून हे पुस्तक अधिकाधिक वर्गापर्यंत गेले पाहिजे, असेही श्री.दीक्षित यांनी नमूद केले.
श्री.भांडारी म्हणाले की, डाव्यांच्या देशविरोधी वर्तनाचे अनेक पुरावे इतिहासात उपलब्ध आहेत.हे पुरावे या पुस्तकाद्वारे मांडले आहेत.डाव्यांच्या देशविरोधी वर्तनाचे देशाला किती परिणाम भोगावे लागले, हे मुळापासून समजून घेण्याची गरज आहे.
विवेक विचार मंच चे अध्यक्ष प्रदीप रावत म्हणाले की,समतेचा , समाजवादाचा उदोउदो करत प्रत्यक्षात समाजात असंतोष पेरण्याचा घातक खेळ डाव्या विचारांच्या संघटनांनी खेळला आहे.कामगार हिताची भाषा करणारे डावे कारखाने, उद्योग बंद पाडून श्रमिकांच्या रोजगारावर पाय आणतात.विचार विश्वावर ताबा मिळवून समाजात बुद्धिभ्रम पसरवण्याचे काम डाव्यांनी केले. नक्षलवादी चळवळीच्या माध्यमातून देशाच्या सार्वभौमत्वापुढे आव्हान निर्माण केले जात आहे, हे ओळखून या शक्तींचा बीमोड केला पाहिजे.
