पुणे : पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना खाजगी रुग्णालयांकडून प्रचंड बिल लावून नागरिकांची लूट सुरू आहे. यामध्ये जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 83 प्रकरणात खासगी रुग्णालयांना नोटीसा देण्यात आल्या असून, बिलांची तांत्रिक तपासणी करुन पुढील कारवाई करण्यात येईल असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
याबाबत राव यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांकडून अधिकचे बील घेतले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. यासाठीच प्रशासनाने 8 उपजिल्हाधिकारी , 28 ऑडिटर आणि 4 डॉक्टर यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती दीड लाखांपेक्षा अधिक बील रुग्णाला दिल्यास एक तासाच्या आत या बिलाची तपासणी करून योग्या आहे किंवा आक्षेप असतील तर तसे स्पष्ट करेल. त्यानंतरच संबंधित रुग्णांने बील पेड करायचे आहे. यात आतापर्यंत या समितीकडे 83 तक्रारी आल्या असून, 11 प्रकरणात स्पष्टीकरण दिले आहे. या सर्व प्रकरणांची तांत्रिक तपासणी करुन दोषी आढळून येणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राव यांनी सांगितले.