सहाशे लिटर प्रति मिनिट (एलपीएम) या क्षमतेच्या या प्रत्येक संयंत्रांमधून १५०हून अधिक खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयांना होणार ऑक्सिजनचा पुरवठा; १ वर्षाची वॉरंटी व २ वर्षांचा वार्षिक देखभालीचा अतिरिक्त प्लॅनही समाविष्ट.
· महाराष्ट्रातील पुणे, रत्नागिरी व सोलापूर येथील सरकारी रुग्णालयांमध्ये आणि कर्नाटक, हरयाणा व उत्तराखंड या राज्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती संयंत्रांची होणार उभारणी
पुणे 6 ऑक्टोबर, 2021 : ‘फॉर्च्यून १००’ श्रेणीतील हनीवेल या कंपनीची सामाजिक संस्था असलेल्या ‘हनीवेल होमटाऊन सोल्यूशन्स इंडिया फाउंडेशन’ने (एचएचएसआयएफ) भारतभरातील सरकारी रुग्णालयांसाठी ऑक्सिजन निर्मिती करणारी १० संयंत्रे उभारणार असल्याचे आज घोषित केले. यातील प्रत्येक संयंत्र ६०० लिटर प्रति मिनिट (एलपीएम) क्षमतेचे आहे. महाराष्ट्रात पुणे, रत्नागिरी व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ही संयंत्रे उभारली जाणार आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या उद्देशाने आरोग्यसेवा यंत्रणेला मदत करण्यासाठी ही ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे उभारीत असल्याचे कंपनीने सांगितले. यातील पहिले संयंत्र पुण्यातील बोपोडी येथील स्व. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर रुग्णालयात आज कार्यान्वित करण्यात आले.
“कोरोना साथीच्या काळात रुग्णांची काळजी घेण्याच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सरकारसोबत भागीदारी करण्यात हनीवेलला आनंद आहे,” असे ‘हनीवेल इंडिया’चे प्रेसिडेंट आशिष गायकवाड म्हणाले. “कोविडच्या रुग्णांना वेळेवर व पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यास त्यांचा जीव वाचेल. या दृष्टीने ऑक्सिजन ही अत्यावश्यक वैद्यकीय सामग्री गणली जाते. सर्वांसाठी सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, हरयाणा आणि उत्तराखंडच्या दुर्गम जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ६०० लिटर प्रति मिनिट (एलपीएम) क्षमतेची १० ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे उभारण्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे,” असे ते पुढे म्हणाले.
‘अमेरिकेअर्स’च्या देखरेखीखाली महाराष्ट्र, कर्नाटक, हरयाणा आणि उत्तराखंडमध्ये १० ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे उभारण्याच्या ‘एचएचएसआयएफ’च्या वचनबद्धतेचा हा उपक्रम एक भाग आहे.
“हनीवेलची ही मदत अतिशय वेळेवर होणारी आणि केंद्रित स्वरुपाची आहे. ही ऑक्सिजन निर्मितीची संयंत्रे कोविड-१९ साथीच्या काळात जीव वाचविण्यात मदत करतील आणि येत्या काही वर्षांपर्यंत सरकारी आरोग्य सुविधांमध्ये गंभीर उपचारांसाठीची गुणवत्ता सुधारण्यात मदत करतील, ” असे ‘अमेरिकर्स’चे एमडी व कंट्री डायरेक्टर श्रीपाद देसाई म्हणाले.
या प्रत्येक संयंत्रामध्ये ६०० एलपीएम ऑक्सिजन उत्पन्न करण्याची क्षमता आहे. ज्या रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात १५०हून अधिक खाटा असतील, तेथील गरज भागविण्यास एवढा ऑक्सिजन पुरेसा होईल. संयंत्रांचा एक वर्षाच्या वॉरंटीचा कालावधी संपल्यानंतर ती सुरळीत चालतील याची तजवीज करण्यासाठी संयंत्रांच्या वार्षिक देखभालीच्या कंत्राटाचा २ वर्षांचा खर्चही हनीवेलकडून भागविला जाईल.
पुण्यातील ऑक्सिजन निर्मिती संयंत्राचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. यामध्ये पुण्याच्या उपमहापौर सुनीता वाडेकर, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (आयएएस), पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांचा समावेश होता.
“कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आकस्मिक योजनांवर पुणे महापालिका सक्रियपणे काम करीत आहे. गेल्या काही महिन्यांत, कोविड साथीच्या नियंत्रणासाठी आणि आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या आमच्या प्रयत्नांत मदत करण्यासाठी ‘हनीवेल’चा आम्हाला मोठा पाठिंबा मिळाला आहे. कोविड केअर सेंटर उभारणे, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स व वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा करणे अशी ही मदत आम्हाला मिळत आहे. पुण्यातील रुग्णालयासाठी ऑक्सिजन निर्मितीचे संयंत्र उभारले गेल्याने आम्ही समाधानी आहोत. हा एक दीर्घकालीन शाश्वततेचा उपाय आहे,” असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. ते पुढे म्हणाले, “कोविडविरुद्धच्या लढ्यात पुण्याला स्वावलंबी होण्यामध्ये ‘हनीवेल होमटाउन सोल्यूशन्स इंडिया फाउंडेशन’चा हातभार लागत आहे, ही बाब फार मोलाची आहे.”
या उपक्रमाबाबत सविस्तर सांगताना, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (आयएएस) म्हणाले, “कोविड साथीच्या मोठ्या प्रादुर्भावामुळे पुणे शहराला सर्वाधिक फटका बसला, ही बाब सर्वजण जाणतात. आमच्या आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आम्ही सतत लढत आहोत. आम्हाला ‘हनीवेल’ने चांगले सहकार्य केले आहे आणि गेल्या काही महिन्यांत आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नात सहाय्य करण्यासाठी ‘हनीवेल’ने उल्लेखनीय कामही केले आहे. ‘हनीवेल’ने दान केलेल्या ऑक्सिजन निर्मिती संयंत्राने पुण्यातील रुग्णांना जीवरक्षक ऑक्सिजनचा पुरवठा मिळण्यात मदत होणार आहे.”
कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेने देशातील आरोग्यसेवेच्या पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण आला. तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने सरकारने विविधांगी काळजी घेत रणनीती आखली आहे. यामध्ये हनीवेल कंपनी आपल्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या (सीएसआर) माध्यमातून सरकारला आरोग्यसेवेच्या क्षमता निर्माण करण्यात मदत करीत आहे. याआधी, ‘एचएचएसआयएफ’ने नैनीताल, गुरुग्राम, दिल्ली आणि पुणे येथे कोविड केअर सेंटर्सची स्थापना केली होती, तसेच मुंबई आणि बंगळुरूमध्ये १० खाटांचा अतिदक्षता विभागही सुरू केला होता. कंपनीने देशभरातील विविध सरकारी व खासगी रुग्णालयांना १००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, १० व्हेंटिलेटर्स, १० हजार एन-९५ रेस्पिरेटर्स आणि २५०० पीपीई किट या वस्तू देणगीदाखल दिलेल्या आहेत.
‘संरक्षण संशोधन विकास संस्था’ (डीआरडीओ) आणि ‘वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद-भारतीय पेट्रोलियम संस्था’ (सीएसआयआर-आयआयपी) यांच्याशी हनीवेलने भागीदारी केली आहे. देशात वैद्यकीय ऑक्सिजन निर्मितीची संयंत्रे उभारण्यास गती मिळावी, याकरीता लागणाऱ्या ‘मॉलिक्युलर सीव्ह अॅडसॉर्बंट’चा (एमओपी) पुरवठा करणे त्यातून ‘हनीवेल’ला शक्य होणार आहे.
महाराष्ट्रात मुंबईतील दहिसर येथील कोविड-१९ जंबो सेंटरमध्ये अतिदक्षता विभाग हनीवेलने उभारला आहे. तसेच पुण्यातील बिबवेवाडी येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालयात २० खाटांचे कोविड उपचार केंद्रही स्थापन केले आहे. ‘हनीवेल’ने राज्यात १२० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स, व्हेंटिलेटर्स, एन-९५ रेस्पिरेटर्स आणि पीपीई किट यांचेही दान केलेले आहे.