पुणे, जेजुरीतील शहनाई-चौघडा वादकांना अन्नधान्य किटचे वाटप
पुणे : कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना कर्तव्याच्या भावनेतून मदत करण्यात येत आहे. मदत म्हणजे एकमेकांना दिलेली हाक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी वेळोवेळी चर्चा करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनामुळे संकटे आली असली तरी शेजारधर्म शिकायला मिळाला, आर्थिक दरी असली उपचारांच्या बाबतीत समानता आली आणि जीवनशैली बदलली असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे यांनी केले.
स्त्री आधार केंद्र-पुणे, प्रथम संस्था-मुंबई आणि उपसभापती कार्यालय, मुंबई यांच्या वतीने पुणे आणि जेजुरीतील शहनाई आणि चौघडा वादकांना प्रातिनिधीक स्वरूपात अन्नधान्य किट वाटप आज गोर्हे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे संयोजन संवाद, पुणे या संस्थेने केले होते. संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रशांत बधे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, ज्येष्ठ शहनाईवादक डॉ. प्रमोद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, संगीतामुळे सुंदर वातावरणनिर्मिती होते. संगीत म्हणजे देवाला मारलेली आर्त हाक आहे. संगीताने अंतर्मनातील सूर जोडले जातात. आम्हाला व्हीआयपी म्हणून मान मिळत असला तरी आम्हाला व्हीआयपी बनविणारी हीच खरी मंडळी आहेत. सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाबरोबर वारंवार बैठका घेतल्या. जेथे समस्या उद्भवली तेथे प्रशासनाच्या माध्यमातून ती समस्या तातडीने सोडविण्यास प्रशासनाने सकारात्मकदृष्ट्या प्रयत्न केल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. राज्य शासनातर्फे केल्या जाणार्या उपाययोजनांची माहितीही त्यांनी दिली. अडचणीतील कलाकार-तंत्रज्ञांना मदत मिळण्यासाठी सुनील महाजन यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
सुनील महाजन म्हणाले, एखादा परिवार अडचणीत असताना वडिल ज्या प्रमाणे आधारस्तंभासारखे उभे राहतात त्याप्रमाणे या समाजाला आपला परिवार मानून सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी निलमताईंचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.
डॉ. प्रमोद गायकवाड यांनी या उपक्रमाचे कौतुक करून व्यवसायबांधवांच्या वतीने आभार मानले. कलेेच्या माध्यमातून आम्ही कलाकार मंडळी मदतीस सदैव तयार आहोत, असे आश्वासन दिले.
कोरोनाकाळात समाजासाठी केलेल्या उपक्रमांविषयी संजय मोरे माहिती दिली. रंगभूमी सेवक संघातर्फे मागण्यांचे निवेदन डॉ. गोर्हे यांना देण्यात आले. निकिता मोघे यांनी आभार मानले.
रंगले सनई-चौघडा वादन
अन्नधान्य किट वाटपाप्रसंगी बबन दगडू शिंदे, विलास धुमाळ, अभिजित जाधव आणि गणेश बबन शिंदे यांचे सनई-चौघडा वादन रंगले. अनपेक्षितपणे झालेल्या वादनामुळे वातावण भारले गेले. हे वादन ऐकून डॉ. निलम गोर्हे यांनी विधान परिषदेतील स्वागताच्या आठवणी जागविल्या. तर सुनील महाजन यांनी सुप्रसिद्ध शहनाईन वादक, भारतरत्न बिस्मिल्ला खान यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रसह इतर राज्यात घेतलेल्या कार्यक्रमांचा आवर्जून उल्लेख केला.