पुणे: शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील ७१ कोटी ७८ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे संचालक आणि विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह चार जणांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. या प्रकरणात १५ जणांवर गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ९ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोसले यांच्यासह बँकेचे संचालक सुर्याजी जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी पडवळ, बँकेचे अधिकारी शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या २०१८-१९ च्या आर्थिक वषार्चे लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचे आदेश दिले होते. या लेखापरिक्षणात ७१ कोटी ७८ लाख रुपयांची तफावत आढळून आली होती.
त्यानुसार, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सीए योगेश लाकडे यांच्या फियार्दीवरून अनिल भोसले यांच्यासह शैलेश भोसले, तानाजी पडवळ, विष्णू जगताप आणि हनुमान सोरते आदी पदाधिकाऱ्यांवर भारतीय दंड संहिता ४२०, ४६८, ४७१ आदी कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोसले यांच्यासह अन्य आरोपीने बँकेच्या अभिलेखमध्ये ७१ कोटी ७१ लाखांच्या केलेल्या बनावट नोंदी लेखपरिक्षणामध्ये उघड झाल्या होत्या.
रिझर्व्ह बँकेकडून २६ एप्रिल २०१९ रोजी करण्यात आलेल्या विशेष तपासणीमध्ये कामकाजात अनियमितता असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आर्थिक अनियमिततेसह अन्य कारणांमुळे निर्बंध लादण्यात आले. संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासन नेमण्याचे आदेश देण़्यात आले. सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर प्रशासकाची नेमणूक केली .
बँकेच्या एकूण ठेवी ४३० कोटी
बँकेचे एकूण कर्जवाटप ३१० कोटी
अनुत्पादीत कर्ज २९४ कोटी
एकूण शाखा १४ शाखा
एकूण खातेदार १६ हजार
घोटाळा असा झाला उघड…
भारतीय रिझर्व्ह बँकने (आरबीआय) शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे रिझर्व्ह बँकने २०१८-१९ चे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बँकेचे ऑडिट केले असता त्यामध्ये ७१ कोटी ७८ लाख रुपये कमी असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये बॅकेचे संचालक असलेले आमदार भोसले यांच्यासह शैलेश भोसले, तानाजी पडवळ, विष्णू जगताप आणि हनुमान सोरते यांच्यासह ११ पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सनदी लेखापाल (सीए) योगेश लकडे यांनी याबाबत शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. भोसले यांच्यासह अकरा जणांनी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी दाखवल्या होत्या. ऑडिट करताना या नोंदी बनावट असल्याचे आढळून आले होते. बँकेच्या एकूण १४ शाखा असून, एकूण १६ हजार खातेदार आहेत. बँकेकडून आतापर्यंत १२ कोटी रुपयांची कर्ज वसुली करण्यात आली आहे.