पुणे-माजी नगरसेवक दत्तोबा ससाणे यांचे शुक्रवारी (ता. 9) निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. ससाणेनगरचे सरपंच ते महापालिकेचे नगरसेवक असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. ससाणे यांनी 2001 पर्यंत सुमारे 25 वर्षे किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनीत नोकरी केली.
1984 ते 1997 या काळात ते ससाणेनगरचे सरपंच होते. तर 2002 ते 2012 असे सलग दोन टर्म नगरसेवक म्हणून हडपसरचे प्रतिनिधित्व केले. नगरसेवक असताना त्यांनी रामटेकडी येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा प्रश्न सोडविला. त्यामुळे हडपसर परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागला. सोलापूर रस्त्याच्या रुंदीकरणाचा महत्त्वाचा प्रश्न त्यांच्या कारकिर्दीतच सोडविला गेला. त्यामुळे हडपसरचा विकास होण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. नगरसेवक असताना त्यांचे सर्व पक्षीयांशी सलोख्याचे संबंध होते.
हडपसरच्या विकासाबाबत त्यांनी सर्वांना सोबत घेऊन वाटचाल केली. सध्या त्यांचे पुत्र योगेश ससाणे त्यांचा वारसा चालवित असून ते नगरसेवक होण्यात त्यांनी मोठा वाटा उचलला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हडपसर परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.