ठेकेदाराचे शाळा दुरुस्ती कामाचे बिल काढण्यासाठी मागितली लाच –पथ विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर
पुणे- पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मोठी कारवाई केल्याच्या घटनेला आठवडा देखील पुर्ण झाला नाही तोवर लाचलुचतप प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पुणे महानगरपालिकेच्या एका उप अभियंत्याला 40 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. शाळा दुरुस्तीच्या कामाचे बिल काढण्यासाठी त्याने ५० हजार रुपयांची लाच मागितली होती त्यापैकी ४० हजाराची लाच घेताना महापालिकेच्या पार्किंगच्या आवारात त्यास पकडण्यात आले .
सुधीर सोनवणे (उप अभियंता, पथविभाग ,पुणे महापालिका) असे अॅन्टी करप्शनच्या सापळयात सापडलेल्या महापालिका अधिकार्याचे नाव आहे.
अॅन्टी करप्शन विभागाने काही दिवसांपुर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सापळा रचून कारवाई केली होती. लाच प्रकरणी थेट स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांच्यासह त्यांच्या पीएला आणि इतर चौघांना अटक केली होती. आजच (सोमवार) अॅड. नितीन लांडगे यांचा अंतरिम जामिन मंजूर झाला आहे. पिंपरी महापालिकेतील लाच प्रकरण ताजे असतानाच पुणे महानगरपालिकेच्या उप अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागा ने 40 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
पुणे लाचलुचतप प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव, अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा, उप अधीक्षक श्रीहरी पाटील
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे अॅन्टी करप्शनच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास अॅन्टी करप्शनचे अधिकारी करीत आहेत.