पुणे – आगामी काळात कोविडची साथ कमी, जास्त प्रमाणात राहील. त्याचा मुकाबला करण्यासाठी तसेच अन्य आजारांवरील उपचारांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालय सक्षम करा अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी कोविड परिस्थिती आढावा बैठकीत आज (शुक्रवारी) बोलताना केली.
राज्याचे उपमुख्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात कोविड साथ आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी आमदार शिरोळे यांनी सरकारला विविध सूचना केल्या. स्थायी वैद्यकीय सुविधांच्या दृष्टीने ससून रुग्णालयाला सक्षम करायला हवे. सरकार, महापालिका यांनी आतापर्यंत जम्बो कोविड सेंटर तसेच रुग्णांना इतर सवलती देण्यासाठी खर्च केलेला आहेच. तज्ज्ञांच्या मते यापुढेही कोविड साथीच्या लाटा येतच रहातील त्याचा मुकाबला करण्यासाठी यापुढील काळात ससून रुग्णालय सक्षम करणं आवश्यक आहे. ससूनच्या आवारात जागाही उपलब्ध आहे. सध्याच्या बेड्सची संख्या वाढवावी आणि तेथीलच नव्या जागेत पायाभूत वैद्यकीय सुविधा उभ्या कराव्यात की, ज्यामुळे कोविड बरोबरच अन्य साथीच्या आजारांना यशस्वीपणे तोंड देणे शक्य होईल असे आमदार शिरोळे यांनी बैठकीत बोलताना सांगितले.
जगातील तीस देशात कोविड साथीची तिसरी लाट येऊन गेली आहे. त्याची तपशीलवार माहिती जमवून राज्य सरकारने त्यावर विचार करावा. तो अभ्यास उपयुक्त ठरेल, असेही आमदार शिरोळे यांनी सांगितले.
टाळेबंदी आणि कोविड साथीच्या काळात जे व्यवसाय, धंदे बंद होते त्यांच्यावर वीज बिलात व्याजावर व्याज आकारले जावू नये. लोकांची घटलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन वीज बिल वसुलीसाठी जबरदस्तीचा तगादा लावला जावू नये. राज्याच्या अर्थचक्राला गती मिळेल तेव्हा वसुली होईलच तोपर्यंत जबरदस्तीने वीज बिल वसुली केल्यास जनतेत असंतोष निर्माण होईल असा इशारा आमदार शिरोळे यांनी दिला.