अमनोरा-पीवायसी एचटीबीए कप बॅडमिंटन स्पर्धा ; हवेली तालुका बॅडमिंटन संघटना आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे : हवेली तालुका बॅडमिंटन संघटना (एचटीबीए) आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमनोरा-पीवायसी एचटीबीए बॅडमिंटन कप अजिंक्यपद स्पर्धेत अनन्या गाडगीळने दुहेरी मुकुट मिळवला. तिने १७ आणि १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा झाली. स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित अनन्याने ओजल रजकवर १५-८, १५-७ अशी १६ मिनिटांत मात केली आणि विजेतेपद पटकावले. यानंतर अनन्याने १९ वर्षांखालील मुलींच्या गटाच्या अंतिम फेरीत श्रेया शेलारवर १५-१७, १५-११, १५-९ अशी ३९ मिनिटांत मात केली आणि दुहेरी मुकुट मिळवला. १६ वर्षीय अनन्या ही केळकर अकादमीत नीता केळकर यांच्याकडे सराव करते.
स्पर्धेतील अकरा वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत सिबतैनरझा सोमजीने मीर शहझार अलीवर १५-५, १५-५ अशी बारा मिनिटांत मात केली आणि विजेतेपद पटकावले. अकरा वर्षांखालील मुलींच्या गटात अग्रमानांकित ख्यात्री कत्रेने अपेक्षेप्रमाणे जेतेपद पटकावले. तिने दुसऱ्या मानांकित तेजस्वी भुतडावर १५-३, १५-३ अशी मात केली. यानंतर १३ वर्षांखालील मुलांच्या गटात अरहम रेडासनीने बाजी मारली. अग्रमानांकित अरहमने चौथ्या मानांकित कपिल जगदाळेला १५-७, १५-७ असे पराभूत केले. तेरा वर्षांखालील मुलींच्या गटात अग्रमानांकित शरयू रांजणेने जेतेपद मिळवले. तिने विजेतेपदाच्या लढतीत दुसऱ्या मानांकित सोयरा शेलारला १६-१४, १५-११ असे २२ मिनिटांत पराभूत केले.
अंतिम फेरीचे काही निकाल : ४० वर्षांवरील पुरुष एकेरी – चेतन शाह वि. वि. शरदचंद्र चवली १५-११, १५-१३. उपांत्य फेरी – चेतन शाह वि. वि. श्रीकांत वाडेकर १५-१२, १६-१४; शरदचंद्र चवली वि. वि. सत्यजित तरदलकर १५-८, १९-२१, १५-१२.
४० वर्षांवरील पुरुष दुहेरी – आदित्य उमराणी – शिवकिरणसिंग ठाकूर वि. वि. चेतन शाह-मकरंद चितळे १५-६, १६-१४. उपांत्य फेरीत – आदित्य उमराणी – शिवकिरणसिंग ठाकूर वि. वि. विनीत दबक – विवेक कांचन १६-१४, १५-१०; चेतन शाह – मकरंद चितळे वि. वि. अजय नागवडे – शशिकांत रूगे ८-१५, १५-८, १५-६.
३५ वर्षांवरील पुरुष एकेरी – आदित्य काळे वि. वि. जयंत पारखी १६-१४, १६-१४. उपांत्य फेरी – आदित्य काळे वि. वि. स्वप्नील चौधरी १५-२, १५-३; जयंत पारखी वि. वि. आनंद साबू १५-११, १५-९.
३५ वर्षांवरील पुरुष दुहेरी – अक्षय गद्रे – जयंत पारखी वि. वि. निखिल गोसावी – तेजस खिंजवाडेकर १५-१२, १५-७. उपांत्य फेरी – अक्षय गद्रे- जयंत पारखी वि. वि. विनीत दबक – विवेक कांचन १५-१०, १५-४; निखिल गोसावी – तेजस किंजावाडेकर वि. वि. निखिल फडणीस – सारंग गांधी १५-६, १५-६.