पुणे : दारू नका दूध प्या, मानवतेचा बोध घ्या… दारुचा पाश जीवनाचा नाश… एक दोन तीन चार दारुबंदीचा करा प्रचार… दारु सोडा आनंद जोडा…असे सांगत नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे. नववर्षाचे स्वागत दारू पिऊन न करता चांगल्या पद्धतीने आनंदात करावे, याकरीता नववर्षाच्या पूर्वसंध्येला विविध सामाजिक संस्था आणि महाविद्यालयांतील तरुणाई व कलाकारांनी जनजागृती केली.
डेक्कन जवळील गुडलक चौकातील कलाकार कट्टा येथे आनंदवन व्यसनमुक्ती व पुर्नवसन केंद्रातर्फे दारू नको, दूध प्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमाला कात्रज डेअरी, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज आॅफ कॉमर्स आणि पुणे पोलीस, पुणे शहर वाहतूक शाखा यांनी सहकार्य केले. यावेळी केंद्राचे अध्यक्ष डॉ.अजय दुधाणे, कात्रज डेअरीचे कुमार मारणे, धनवीर वाडकर, संतोष पटवर्धन, केतन जैन, दत्तात्रय सोनार, संजय हिरवे, अनिरुद्ध हळंदे, विजय शिंदे, प्रसाद चांदेकर, शैलेश बढाई, जयंत हिरे, विवेक राजगुरु, निखिल कदम, मनीष भोसले, प्रकाश पवार, राहुल बोंबे, मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयाचे प्रा. प्रा.डॉ.देविदास गोल्हार, प्रा.प्रवीण कड, प्रा. सुशील गंगणे, प्रा. प्रमोद सपकाळ, प्रा.कल्पना वैद्य यावेळी उपस्थित होते. कात्रज डेअरीच्या संचालक केशर पवार यांनी विशेष सहकार्य केले.
कलाकार पलाश साठे यांनी देखील लोकांना दूध वाटप करुन जनजागृती केली. मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज आॅफ कॉमर्सच्या एन.एस.एस च्या विद्यार्थ्यांनी जनजागृती करण्याकरिता सक्रिय सहभाग घेतला. उपक्रमाचे यंदा ११ वे वर्ष असून यावेळी महाविद्यालयीन तरुणाईने घोषणा देत दारू करते कुटुंब उध्वस्त… असे संदेश फलक घेऊन जनजागृती देखील केली. पथनाट्य, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करीत सरत्या वर्षाला निरोप दिला.
डॉ. अजय दुधाणे म्हणाले, नवीन वर्षाचे स्वागत तरुणाई दारूचे सेवन करून करते. यामुळे व्यसनाधीनता वाढत जाते. नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करावी आणि व्यसनाधीनतेची झालर नववर्षाच्या पूर्वसंध्येला नसावी यासाठी दूधाचे वाटप करून दारू नको दूध प्या हा उपक्रम राबविला जातो.