पुणे ता. २७: स्वदेशी उद्योगांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम राबवत उद्गार संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दीपावली प्रदर्शनाचे काल माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते उद् घाटन झाले. यावेळी संस्थेच्या संचालिका आसावरी पाटणकर आणि लेखक सुजीत भोगलेही उपस्थित होते. वारजे उड्डाणपूलाजवळील पाटणकर सभागृह येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले असून येत्या १० नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी ४ ते ८ या वेळेत ते सर्वांसाठी मोफत खुले असेल.
यावेळी कुलकर्णी म्हणाल्या, “आज ज्याला ग्लोबल ब्रॅण्ड आपण म्हणत आहोत ते कधीकाळी लोकल ब्रॅण्डच होते. मात्र, तिथल्या स्थानिक लोकांनी त्या वस्तूंचा अवलंब केला. त्याचा जागतिक पातळीवर पद्धतशीरपणे प्रचार आणि प्रसार केला. याशिवाय त्या वस्तूंविषयी अभिमान बाळगला. त्यामुळेच त्या वस्तू लोकल ते ग्लोबल हा पल्ला गाठू शकल्या. येत्या काळात आपणही स्वदेशी वस्तूंना प्राधान्य द्यायला हवे. आज हाच व्यापक दृष्टीकोन समोर ठेवत उद्गार संस्थेने घेतलेला पुढाकार अतिशय स्तुत्य आहे. या प्रदर्शनास अधिकाधिक पुणेकरांनी भेट देऊन, स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे.”
यावेळी पाटणकर यांनी प्रदर्शनाविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, कोणताही व्यावसायिक हेतू न बाळगता संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून,आम्ही हा उपक्रम राबविला आहे. सणासुदीची दिवस लक्षात घेऊन यामध्ये कलात्मक रंगवलेल्या पणत्या, टी कॅण्डल, ॲरोमॅटिक कॅण्डल, दिवाळी गिफ्ट (आयुर्वेदिक उटणे, सुगंधी तेल, साबण, दोन पणत्या इ.), सुकामेवा, इंदोरी नमकिन, नैसर्गिक अत्तरे, मार्बल मूर्ती आणि इतरही अनेक आकर्षक अशा शोभिवंत वस्तूंचा प्रदर्शनात समावेश आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, लॉकडाऊननंतर हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येत असले तरी या काळात सर्वाधिक फटका हा स्थानिक उद्योजकांना बसला आहे. बाजारपेठेतील निर्बधांमुळे आपले उत्तम दर्जाचे उत्पादन असूनही ते ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास त्यांना मर्यादा आल्या आहेत, ही परिस्थिती लक्षात घेत उद्गारने स्थानिक उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी प्रदर्शन स्थळी घेतली जात असून चोखंदळ पुणेकरांचा यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल, असा विश्वासही पाटणकर यांनी व्यक्त केला आहे.
दिव्यांग मुलांना द्या प्रोत्साहन
या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षक म्हणजे दिव्यांग मुलांनी रंगविलेल्या अत्यंत सुबक आणि रेखीव पणत्या तसेच त्यांनी स्वत: तयार केलेल्या आकर्षक शोभेच्या वस्तू, कानातले, गाळातले इ. दागिने. शारीरिक कमतरतेवर मात करत प्रत्येक कलेकडे संधी म्हणून बघणार्या दिव्यांग मुलांनी दिवाळीनिमित एकाहून एक कलाकृती साकारल्या आहेत. तरी या वस्तूंची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही उद्गारतर्फे करण्यात आले आहे.