पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म दिनानिमित्त दि. 19 फेब्रुवारी 2018 रोजी शिवनेरी किल्यावर होणारा शिवजयंती उत्सव योग्यरित्या पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म दिनानिमित्त दिनांक 17 ते 19 फेब्रुवारी 2018 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती उत्सव साजरा करण्याबाबत श्री. राव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली, त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. यावेळी आमदार शरद सोनवणे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे आदी उपस्थित होते.
श्री.राव म्हणाले, शिवजयंती कार्यक्रमाची रुपरेषा सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व विभाग व पर्यटन विभागांनी ठरवावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ सुशोभिकरण, गडावरील साफ-सफाई तसेच गडावरील आकर्षक विद्युत रोषणाई करण्याबाबतचे नियोजन महसूल, पुरातत्व विभाग व राज्य विद्युत वितरण महामंडळाने करावे. रस्त्यांची डागडूजी तसेच हेलिपॅड, स्टेज व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी. शिवजयंती कार्यक्रमास गडावर महत्वाच्या व्यक्ती उपस्थित रहाणार असल्यामुळे गडावरील परिसर व कार्यक्रमस्थळी सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन पोलीस विभागाने करावे, असेही श्री. राव यांनी नमूद केले.
आमदार सोनवणे म्हणाले, शिवजयंती कार्यक्रम योग्य रितीने पार पाडण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी सहकार्य करावे. महोत्सव कालावधीमध्ये चित्रकला, वक्तृत्व, निबंध, रांगोळी स्पर्धा व अन्य विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार असून याचे नियोजन सबंधित विभागांनी करावे.
बैठकीस सबंधित विविध विभागांचे अधिकारी आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.