डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अॅण्ड एज्युकेशनल ट्रस्ट ; डॉ.नीलम गो-हे, सुषमा अंधारे यांची उपस्थिती
पुणे : जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूस्च्या डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने तिसरा आदर्श माता पुरस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई अनंतराव पवार यांना प्रदान करण्यात येणार आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण भारताला अजित पवार यांच्या रुपाने एक कर्तृत्ववान नेतृत्व देणा-या आशाताईंना यंदाच्या आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांनी दिली.
कार्यक्रमाला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे, व्याख्यात्या सुषमा अंधारे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, अॅड. शार्दुल जाधवर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराचे यंदा तिसरे वर्ष असून संस्थेच्या खजिनदार सुरेखा सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हा विशेष सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदा हा कार्यक्रम आॅनलाईन पद्धतीने होणार आहे.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, आशाताई पवार यांनी स्वत: शेतीची काम देखील केली आहेत. अजित पवार यांच्या रुपाने त्यांनी एक रत्न महाराष्ट्राला दिले. आशाताईंनी लहानपणापासून दिलेली शिकवण आणि आत्मविश्वास आज अजित पवार यांच्यामध्ये पहायला मिळतो. अजित पवार यांच्या कार्यामागे त्यांच्या मातोश्रींचे अमूल्य योगदान व मार्गदर्शन आहे. त्यामुळे यावर्षी त्यांना संस्थेतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.