पुणे : बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे शासन आदेशानुसार मंदिरे खुली होण्याचा पहिला दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. दत्तमंदिरात मयूरमहालाची प्रतिकृती साकारुन पुष्पआरास, विद्युतरोषणाई देखील करण्यात आली होती. दिवसभरात खासदार वंदना चव्हाण, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, प्रख्यात शेफ मधुरा बाचल यांसह विविध मान्यवरांनी दत्तमहाराजांचे दर्शन घेत आरती केली.
यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार राजू बलकवडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उपप्रमुख अॅड.रजनी उकरंडे, विश्वस्त युवराज गाडवे, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, अॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ यांसह माजी विश्वस्त अंकुश काकडे आदी उपस्थित होते. सकाळी ७ वाजता मंदिराचे प्रवेशद्वार खुले करुन मंदिर उघडण्यात आले.
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरामध्ये वणी येथील सप्तश्रृंगी मातेची प्रतिमा साकारण्यात आली आहे. मंदिरावरील ध्वजाचे पूजन करुन ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी श्रेयस सुनिल रुकारी व सुमाली श्रेयस रुकारी यांच्या हस्ते श्री दुर्गा यागाला प्रारंभ झाला. सनई-चौघडा व मयूर बँडच्या वादनाने भाविकांचे स्वागत करण्यात येत होते. खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते मंदिराचे प्रवेशद्वार उघडण्यात आले. त्यानंतर दत्तमहाराजांची आरती झाली. दुपारी माध्यान्ह आरती जयंत पाटील व त्यानंतर मधुरा बाचल यांच्या हस्ते पार पडली.
सायंकाळी श्री विश्वेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल गाडवे व उपाध्यक्ष मनोज साखरे यांच्या हस्ते सहकुटुंब आरती झाली. नवरात्रीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम व भजन मंदिरात करण्यात येणार आहे. कोविडविषयी शासनाने घालून दिलेले सर्व नियम मंदिरात पाळण्यात येत आहेत. मास्क व थर्मल स्कॅनिंगशिवाय मंदिरात प्रवेश दिला जात नाही.