पुणे : पाझर तलावात बुडून तलाठी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. भोर तालुक्यातील वरवे खुर्द गावात ही घटना घडली. मुकुंद त्रिबंकराव चिरके (वय ३५, सध्या रा.नसरापूर, ता. भोर, जि. पुणे, मूळ रा. जहागीरमोहा, ता. माजलगाव, जि. बीड) असे मृत्युमुखी पडलेल्या तलाठ्याचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, मंडलाधिकारी सचिन कंडपेल्ली, विद्या गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी आदींनी घटनास्थळी भेट दिली. मृत्यू पावलेले चिरके हे तरुण असलेले तलाठी असल्याने याप्रकरणी सखोलपणे चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे मात्र पोलिसांनी सध्या तरी अकस्मात मयत अशी नोंद केली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकुंद चिरके मित्रांबरोबर दररोज सकाळी फिरायला जायचे. सोमवारी सकाळी मुकुंद आणि त्यांचे तीन मित्र नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडले. सकाळी सातच्या सुमारास वरवे खुर्द गावातील लघुपाटबंधारे विभागाच्या पाझर तलावात ते पोहण्यासाठी उतरले. त्या वेळी पोहताना त्यांची दमछाक झाली आणि ते पाण्यात बुडाले. काठावर थांबलेल्या मित्रांच्या लक्षात हा प्रकार आला. ग्रामस्थांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. भोईजल पथकाने शोधमोहीम राबवून दुपारी त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.