पुणे- केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्याकडे सर्व्हिस रस्त्यांच्या कामाबाबत वारंवार पत्रव्यवहार केला आहे. या रस्त्यांचे काम करण्याबाबतही सूचना देण्यात आलेल्या असताना या रस्त्यांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पालिका आता केंद्रीय मंत्र्यांचे आदेशही ऐकत नाहीत का? असा सवाल करीत या रस्त्यांच्या कामासाठी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.चांदणी चौकातील झिनीया सोसायटी, रामनदी सोसायटी, फ्लेमिंगो सोसायटी, कुणाल बेलेजा सोसायटी या सर्व सोसायट्यांच्या प्लॅनची मंजूरी राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 लगतच्या 12 मीटर सर्व्हिस रस्त्यावर करण्यात आलेली आहे. मात्र, अद्याप हा रस्ता न झाल्यामुळे येथील 500 ते 700 सदनिका धारकांना दररोज मोठा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे या सेवा रस्त्यांची कामे तात्काळ पूर्ण करावीत अशी मागणी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी केली आहे.
सदर रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना संबंधित विभागास कराव्यात, अशी मागणी महानगरपालिकेचे प्रकल्प अधिकारी कार्यकारी अभियंता इंद्रभान रणदिवे, एन.सी.सी.चे कनिष्ठ अभियंता श्रीनिवास व कंत्राटदार किशोर भरेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आशा नाथ, मनीष देव, माजी सैनिक सतीश गोडबोले, राजविंदर कथपाल, विजय फडके, मिलिंद चिटणीस, मंगेश नारखेडकर उपस्थित होते.