पुणे- महापौर मुरलीधर मोहोळ यांना काल कोरोनाची लागण झाली त्यानंतर आज त्यांच्या कुटुंबातील 8 सदस्यांनाही या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. महापौर मोहोळ यांच्यावर कोथरूडमधील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मोहोळ यांच्या कुटुंबातील 17 सदस्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर, इतर सदस्यांचे अहवाल येणे बाकी आहे.
महापौर यांचे आई-वडील, मुलगी, पत्नी आणि जवळचे नातेवाईक यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये काही जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मोहोळ यांच्या कुटुंबातील ज्या लहान मुलांना सौम्य लक्षणे आहेत, ते घरातच राहणार आहेत .परवा पुण्यातील विधानभवनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संदर्भात बैठक घेतली होती. त्यावेळी महापौर मोहोळ आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.महापौर मोहोळ यांनी काल स्वतः बाबत ट्विट्द्वारे माहिती दिली. थोडासा ताप आल्याने मी माझी कोरोना टेस्ट केली. ती पॉझिटीव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर आहे. लवकरच बरा होऊन पुन्हा सर्वांच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील, असे महापौरांनी ट्विट्मध्ये म्हटले होते .पुणे शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्या नंतर फेसबुक ,ट्विटर वर महापौर मोठ्या प्रमाणावर सातत्याने जनसंपर्क साधून होते .या शिवाय ते शहराच्या विविध भागात होणाऱ्या बैठकांना,कार्यक्रमांना हजर राहत होते.महापालिकेतील स्थायी समिती च्या बैठका होत असल्या तरी मात्र आपल्या अधिकारात , आणि सर्व पक्षनेत्यांना विश्वासात घेऊन मुख्यसभा कोरोनाच्याच कारणाने घेणे त्यांनी बंद केले होते .त्यानंतर महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिपाली धुमाळ त्यांचे पती तसेच कॉंग्रेसचे अविनाश बागवे यांना कोरोनाची लागण झाली होती मात्र कोरोनावर यशस्वी मात करून धुमाळ ,बागवे हे सुखरूप घरी परतले . महापालिकेत सुमारे २०० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त येत असताना आता महापौरांनादेखील कोरोना झाल्याने याप्रकरणी अति गंभीर वातावरण दिसून येते आहे.