पुणे, ता.20: अयोध्येत भव्य असे राममंदिर निर्माण करण्यासाठी सर्व धर्मीयांकडून निधी येणे सुरु झाले आहे. या कार्यासाठी औंध बोपोडी भागातून जास्तीत जास्त निधी जमा करणार असल्याचे प्रतिपादन भाजप शहर चिटणीस सुनील माने यांनी केले. औंध – बोपोडी परिसरात आज या मोहिमेची सुरुवात करण्यात आली यावेळी ते बोलत होते.
माने म्हणाले,आपल्याला मंदिर निर्माणाच्या निमित्ताने सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणायचे आहे. म्हणूनच राम मंदिर उभारणीसाठी रामभक्त आणि सर्वांचा हातभार लागण्यासाठी निधी जमा केला जाणार आहे. यासाठी देशभरामध्ये मकरसंक्रांतीपासून मोहीम राबवली जात आहे. पुण्यातसुद्धा ही मोहीम राबवली जात आहे. आज औंध – बोपोडी भागामध्ये गणेश मंदिरातील गणरायाला वंदन करून याची सुरुवात करण्यात आली. लोकांनी ही या मोहिमेचे कौतुक करत उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे. औंध येथील मोहिमे दरम्यान वाढदिवसानिमित्त गणेश दर्शनासाठी आलेल्या डॉ.जितेंद्र खंडेलवाल यानी 1100 रुपये देऊन या मोहिमेची सुरुवात केली. त्याचप्रमाणे मोतीलाल बाफना यांनी धनादेश दिला. यावेळी परीक्षित बेडदुर,माजी नगरसेवक आनंद छाजेड, सामाजिक कार्यकर्ते रमेश काकडे, खडकी शिक्षण संस्थेचे संचालक रमेश अवस्थी,योगेश केरकर यांच्यासह मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते.