क्रेडाई महाराष्ट्र या राज्यव्यापी बांधकाम व्यावसायिक संघटनेस यशस्वीरित्या २५ वर्षे पूर्ण झाल्याने रौप्यमहोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा काल २७ सप्टेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने खेळीमेळीत व उत्साहात पार पडली. अशी माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष राजीव परीख व मानद सचिव सुनील कोतवाल यांनी दिली.
महाराष्ट्रातील ५७ शहरांतील क्रेडाई चॅप्टर्स मधून जवळपास १००० हून अधिक सदस्य सभेत सहभागी झाले होते. सभेचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय क्रेडाई अध्यक्ष श्री. सतीश दादा मगर यांनी खास मुलाखतीतुन सभासदांना बांधकाम व्यवसायाच्या कठिण कालावधीमध्ये टिकून राहणे महत्वाचे असल्याचे सांगून लहान शहरातील सभासदांना चांगले व्यवसायिक मार्गदर्शन केले व ग्राहक, कामगार, नोकरवर्ग योग्य रीतीने सांभाळणेचे आवाहन केले. यावेळी त्यांच्या उपस्थितीत ११ माजी अध्यक्षांचा ऑनलाइन सत्कार समारंभ संपन्न झाला.
राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल जी कटारिया यांनी जीएसटी, बांधकाम नियमावली, रेडीरेकनर, स्टॅम्प ड्युटी साठींच्या राज्य व केंद्र सरकारच्या तरतुदींचा उहापोह केला.
राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री. अनंत राजेगावकर यांनी बांधकाम व्यावसायिकांसाठी उदयोन्मुख संधी यावर प्रकाशझोत टाकला तर *बांधकाम खर्चात कशी कपात करावी यावर उदबोधक माहिती श्री. दिलीप मित्तल व निलेश अगरवाल यांनी देऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.
राजीव परीख यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सन 2019-20 मधील क्रेडाईच्या कार्याचा आढावा घेऊन सभासदांना संघटनेचे महत्व कथित केले तर खजिनदार गिरीश रायबागे यांनी वार्षिक हिशोब सादर केला. मानद सचिव श्री. सुनील कोतवाल यांनी सेक्रेटरी रिपोर्ट सादर करत सूत्रसंचालन देखील केले.
शिरपूर येथे नवीन ५७ व्या क्रेडाई चॅप्टरचे अनावरण सर्व मान्यवरांचे हस्ते झाले व शांतीकुमार जैन यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी वार्षिक बुलेटीन व शहरांचे माहिती पुस्तक अनावरण करण्यात आले. सहसचिव विकास लागू यांच्या आभार प्रदर्शनाने सभेची सांगता झाली.