‘करोना’च्या पार्श्वभूमीवर कॅटलिस्ट फाऊंडेशनचा निर्णय
पुणे ता. १६: जगभर थैमान घालणाऱ्या करोनाचे रुग्ण पुण्यातही आढळून येत आहेत.
या विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची दिवसागणिक वाढणारी संख्या चिंताजनक असून या पार्श्वभूमीवर, आंबेडकर जयंतीनिमित्त होणारा चित्ररथ सोहळा आणि त्यासाठीची तयारी कॅटलिस्ट फाऊंडेशनने
लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष सुनील माने यांनी सांगितले की, चित्ररथासारख्या दृक श्राव्य संकल्पनेतून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महान विचार सर्वदूर पोहोचविण्याचा उपक्रम आम्ही जयंतीनिमित्त हाती घेतला होता. डॉ. बाबासाहेब हे विशिष्ट घटकांपुरते मर्यादित न राहता त्यांचे आजही मार्गदर्शक ठरणारे विचार तरुण पिढीत रूजावेत, हा या मागील उद्देश होता. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला प्रथमच असा उपक्रम होणार होता. यास स्पर्धेचे स्वरूप दिल्याने राज्यभरातून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत होता.
परंतु, शहरात सध्या संसर्गजन्य कोरोनाचे सावट आहे. सतर्कता म्हणून जिल्हा प्रशासनाने देखील गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. चित्ररथ सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचू नये, या दक्षतेतून आम्ही हा उपक्रम आणि त्यासाठीची तयारी लांबणीवर टाकली आहे. या उपक्रमाची पुढील तारीख निश्चित झाली नसून आगामी काळात परिस्थिती बघूनच याविषयी आम्ही निर्णय घेणार असल्याचेही माने यांनी स्पष्ट केले आहे.
………………