पुणे-‘क्रेडाई महाराष्ट्र’ या बांधकाम व्यावसायिकांच्या राज्य पातळीवरील शिखर संघटनेतर्फे राज्यभरातील बांधकाम व्यावसायिकांसाठी मुंबई येथे 6 व 7 जानेवारी रोजी दोन दिवसीय विशेष अधिवेशन आयोजित केले आहे.विले-पार्ले मधील हॉटेल सहारा येथे हे अधिवेशन होणार आहे.राज्यातील क्रेडाईच्या तालुका आणि जिल्हास्तरीय ५७ शाखांमधून सुमारे ७०० बांधकाम व्यावसायिकांनी या अधिवेशनासाठी नोंदणी केलेली आहे.
देश व राज्य पातळीवरील आव्हानात्मक परिथितीमुळे गृहबांधणी क्षेत्रासाठी भविष्यकालीन उपाययोजना आखणीसाठी हे अधिवेशन अत्यंत मोलाचे आहे असे मानले जाते. “महाकॉन-२०२०” हा क्रेडाई महाराष्ट्राचा सलग ७ वर्षे सुरु असलेला हा उपक्रम, सभासदांना अत्याधुनिक बांधकाम प्रणाली, अद्ययावत कायदे, कर रचना, ग्राहक हीत, आर्थिक शिस्त, व्यावसायिक बांधिलकी या व इतर अनेक विषयांवर उपयुक्त मार्गदर्शन देणारे व्यासपीठ उपलब्ध करतो.
“रायझिंग अबोव्ह”, “RISING ABOVE” असे ब्रीद वाक्य घेऊन संपन्न होणाऱ्या महाकॉन-२०२० चे उद्घाटन मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांचे प्रमुख हस्ते होणार आहे. त्याचबरोबर युवानेते कॅबिनेट मंत्री मा. श्री. आदित्य ठाकरे, मा. आ. श्री. रोहित पवार व मा. आ. श्री. ऋतुराज पाटील, या तरुण व तडफदार आमदारांच्या समवेत महाराष्ट्राच्या पुढील दिशेवर आधारीत वार्तालाप हा या महाकॉनचा आकर्षण बिंदू ठरेल.
या बरोबरीने क्रेडाई नॅशनलचे प्रेसिडेंट श्री. सतीश मगर, चेअरमन श्री. जक्षय शहा, उपाध्यक्ष श्री. शांतीलाल कटारिया, भारतीय अब्जाधीश गुंतवणूकदार श्री. राकेश झुनझुनवाला, पूज्य गुरु श्री ग्यानवत्सल स्वामीजी, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या व्हाईस प्रेसिडेंट सौ. रचना भुसारी आदी वक्त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे नगरविकास अतिरिक्त मुख्य सचिव मा. डॉ. नितीन करीर हे नवीन बांधकाम नियमावली विषयी तर महारेरा चेअरमन श्री. गौतम चटर्जी हे रेरा विषयी सर्वांना संबोधीत करणार आहेत. त्याचबरोबर अन्य तज्ज्ञ वक्ते देखील बांधकाम विषयांवर दोन दिवस मार्गदर्शन करणार आहेत.
नूतन सरकार व नुकताच झालेला मंत्री मंडळ विस्तार या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यावसायिकांना या सरकार कडून आपल्या अपेक्षा व अडचणी मांडण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
राज्यातील प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाच्या दृष्टीने तसेच बांधकाम क्षेत्राच्या एकूण वाटचाल व नवीन तंत्रज्ञानाचा वापर या दृष्टीने हे “महाकॉन-२०२०” अत्यंत मोलाचे असल्याचे प्रतिपादन क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. राजीव परीख, मानद सचिव श्री. सुनील कोतवाल, खजाननीस श्री. गिरीश रायबागे, समन्वयक श्री. वसंत भद्रा, सह-समन्वयक श्री. चिराग शहा व कार्यकारीणी मंडळ यांनी केले आहे.