पुणे-प्रदेश कॉंग्रेस चे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांना बदलण्याचे स्पष्ट केल्यानंतर आता नवीन गटनेता पदासाठी जेष्ठ नगरसेवक आबा बागुल, अभ्यासू नगरसेवक अविनाश बागवे आणि रविंद्र धंगेकर यांच्या नावात शर्यत सुरु झाली आहे. या शर्यतीत चौथे नाव विद्यमान गटनेते अरविंद शिंदे यांचे सुद्धा आहे. राहिलेल्या दीड वर्षाच्या कालावधीसाठी त्यांना का बदलावे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असल्याचे समजते.कॉंग्रेस भवनात निरीक्षक राजेश शर्मा यांनी गटनेता पदाबाबत सुमारे ४ तास शहर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व नगरसेवक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली . या साठी कोणाला बोलवायचे यांच्या नावाची यादीच त्यांनी शहराध्यक्षांकडे दिली होती .निरीक्षक शर्मा हे आपला अहवाल प्रदेशाध्यक्ष यांना देतील आणि नंतर प्रदेशाध्यक्ष नव्या नावाची निवड घोषित करतील असे सांगण्यात आले.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत कसबा मतदारसंघात महापालिकेत गटनेता असलेले अरविंद शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी शिंदे यांचा पराभव केला होता. याच मतदारसंघात नगरसेवक रविंद्र धंगेकर काँग्रेसतर्फे प्रबळ इच्छुक होते. त्यांनी सुरुवाती पासून विधानसभा निवडणुकीची तयारी केली होती.मात्र, ऐनवेळी त्यांना नाकरून अरविंद शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. पर्वती विधानसभा मतदारसंघात आबा बागुल इच्छुक होते. त्यावेळी त्यांना उमेदवारी मिळाली नाही. विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही ,ज्येष्ठ आहेत ,सक्षम आहेत म्हणून हे दोघे गटनेता पदाच्या शर्यतीत आहेत तर परफार्मनन्स पहा आणि गटनेता ठरवा अशा मार्गाने अविनाश बागवे शर्यतीत उतरले आहेत .यावर काँग्रेसचे निरीक्षक राजेश शर्मा यांनी शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली . त्यानंतर आता काँग्रेस गटनेते पदाची संधी कोणाला मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान शहराध्यक्ष बदलाच्या केवळ वावड्या असून हि चर्चा मुद्दामहून काही माध्यमांतून घडवून आणली जात असल्याचे येथे सांगण्यात आले. शहराध्यक्षपदी असलेले रमेश बागवे हे सदैव कार्यशील असलेले मातंग समाजाचे आणि कॉंग्रेसचे आक्रमक स्थानिक नेते आहेत .त्यांना येत्या एप्रिल मध्ये या पदावर ३ वर्षे पूर्ण होतील . त्यांनी केलेली वारंवार ची आंदोलने आणि घेतलेले कार्यक्रम यात सहभागी न होता किंवा नाममात्र सहभागी होणारी आणि भाजपसारख्या विरोधी पक्षात उठबस असणारी मंडळी शहराध्यक्ष बदलाच्या वावड्या उठवीत असल्याचा आरोप यावेळी काहींनी केला .
तर दुसरीकडे महापालिकेतील विद्गयमान आणि मावळते गटनेते अरविंद शिंदे यांनी मात्र पक्षाबद्दल पूर्ण आदर व्यक्त करून आभार मानले आहेत . गेली ८ वर्षे आपल्याला महापालिकेतील गटनेते पदावर संधी मिळाली आणि आपण समाधानपूर्वक कामगिरी केली असे त्यांनी म्हटले आहे.