केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ जानेवारी रोजी होणार कार्यक्रम…..
पुणे : भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या आमूलाग्र बदल होत आहेत, त्यामुळे आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नागरी बँकांचे स्थान कसे असेल, त्याचे भवितव्य कसे राहील, याविषयावर संवाद या संस्थेतर्फे येत्या ९ जानेवारी रोजी बँकिंग वार्तालाप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी पेठेतल्या एस. एम जोशी सभागृहात सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते, यांच्याबरोबरच विविध नागरी सहकारी बँकांचे अध्यक्ष आणि संचालक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम झाल्यानंतर केंद्रीय अर्थराज्य मंत्री यांच्याबरोबर प्रश्नोत्तरे होणार आहेत. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी ठेवण्यात आला आहे. कोरोना संदर्भात सरकारकडून निश्चित करण्यात आलेल्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सुनील महाजन आणि सचिन इटकर यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.