घंटानाद करून दिला इशारा,उदयापासुन संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवणारच ..
पुणे/पुण्यात व्यापारी महासंघाने जागोजागी आज घंटानाद आंदोलनाला सुरूवात केली आहे. लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करून शहरातील दुकानांची वेळ वाढून देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी यातून सरकारचे लक्ष वेधले आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य स्तरा वरुन देखील व्यापारी वर्गाची सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत व्यवसाय करू देण्याची मागणी योग्य असल्याचे स्पष्ट करत जाहिर पाठिम्बा दिला जातोय, असे असताना, आम्ही व्यापाऱ्याना घाबरत नाही असे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य येणे दुर्दैवी आहे, आम्ही कोणाला घाबरवण्यासाठी नाही तर हक्कासाठी आंदोलन करत आहे असे या वेळी व्यापारी महासंघाचे एफ एम रांका यांनी ‘माय मराठी’ला सांगितले.
झोपचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी व व्यापारी वर्गाला योग्य न्याय मिळावा, याकरिता शहरातील सर्व व्यापारी विविध ठिकाणी आज घंटानाद आंदोलनाला सुरुवात झाली आहे.उद्यापासून पुणे शहरातील सर्व दुकाने ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येतील. यावेळी आम्हाला अटक करून आमच्यावर कारवाई झाली. तरी आम्ही त्यास सामोरे जाण्यास तयार असल्याची भूमिका शहरातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे.