पुणे: पुण्याजवळ दिवे घाटात अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोन वारकऱ्यांच्या वारसांना भारतीय जनता पार्टी आपल्या आपदा ट्रस्टमधून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करेल तसेच गंभीर जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या शस्त्रक्रियेसह सर्व उपचारांचा खर्च भाजपातर्फे करण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी जाहीर केले.
चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्तिकी वारीतील अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांची पुण्यातील हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल मध्ये जाऊन विचारपूस केली. संत नामदेव महाराजांचे वंशज सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज आळशी यांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना भाजपातर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले.
या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या शस्त्रक्रियेचा आणि रुग्णालयातून घरी गेल्यानंतर होणारा औषध उपचारांचा खर्च भाजपातर्फे करण्यात येईल, असेही मा. प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.