पुणे–राज्याचे सीबीआयकडून येस बँक घोटाळा प्रकरणी मुंबई आणि पुण्यात छापेमारी करण्यात आली आहे. यात बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या घरावरही साबीआयने धाड टाकली आहे. पुण्यातील बाणेरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. अविनाश भोसले यांची सीबीआयकडून सध्या कसून चौकशी केली जात आहे. यामुळे राजकीय आणि बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
अविनाश भोसले यांचे राज्यातील अनेक राजकीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांचे सासरे अशीही भोसले यांची ओळख आहे. यामुळे या कारवाईने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. सीबीआयकडून विनोद गोयंका आणि शाहिद बलवा यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे. आज सीबीआयकडून मुंबई, पुण्यात 8 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ईडीने यापूर्वी अविनाश भोसले यांच्यावर कारवाई केली आहे. एका कारवाई दरम्यान ईडीने त्यांची तब्बल 40 कोटींची संपत्ती जप्त केली होती. यामुळे आजच्या सीबीआय कारवाईमध्ये कोणती माहिती पुढे येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
येस बँक डीएचएफएल घोटाळ्या प्रकरणी ही चौकशी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच या प्रकरणी सीबीआयने प्रसिद्ध बिल्डर संजय छाबडिया यांना अटक केली आहे.येस बँक आणि डीएसएफएलच्या फसवणूक प्रकरणात सीबीआय व्यक्तिरिक्त ईडीही तपास करत आहे. येस बँकचे संस्थापक राणा कपूर यांनी पदाचा दुरुपयोग करून डीएसएफएलला फायदा पोहोचवल्याचा त्यांच्यावर आरोप आहेत.