भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत रंगला मंगल परिणय सोहळा
पुणे-
लॉकडाउनमुळे अनेकांना विवाहाचा मुहूर्त बदलावा वा पुढे ढकलावा लागला आहे. तसेच, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाउन पुन्हा पुढे ढकलले गेले तर या भीतीने लग्नासाठी बघितलेल्या सर्व स्वप्नांना मुरड घालत काहींनी साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
गुलटेकडी येथील प्रशांत सलगर आणि मार्केटयार्डमधील रेखा सोनटक्के हे जोडपेही यातलेच एक. त्यांनी रविवारी साध्या पद्धतीने सप्तपदी घेतल्या. यांच्या लग्नासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली होती.
गुलटेकडी डायस प्लॉट भागात राहणारा प्रशांत सलगर आणि मार्केटयार्ड प्रेमनगर वसाहत येथील रेखा सोनटक्के यांचा साखरपुडा जानेवारी महिन्यात झाला आणि त्यांचा विवाह एप्रिलमध्ये करण्याचे ठरले होते. मात्र, लॉकडाउन वाढल्याने हा सोहळा दोनदा पुढे ढकलण्यात आला. विवाह होणार की नाही अशा चिंतेत असलेल्या कुटुंबाचा प्रश्न भाजप झोपडपट्टी आघाडीचे गणेश शेरला व गुलटेकडी एकता प्रतिष्ठानच्या पुढाकाराने सोडवण्यात आला.
ना वरात, ना कसला गाजावाजा फक्त वरा कडील मोठा भाऊ व वधू कडील आई आणि आमदार पाटील, माजी सभागृह नेते नगरसेवक श्रीनाथ भिमाले, भाजप झोपडपट्टी आघाडीचे शेरला, बुद्ध विहाराचे अध्यक्ष गणेश चव्हाण, सचिन खंडाळे, अमोल खंडाळे, भन्ते सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत सातारा रस्ता येथील तक्षशिला बौद्ध विहारात हा विवाह सोहळा संपन्न झाला.
या वेळी शेरला म्हणाले, प्रशांत सलगर गुलटेकडी डायस प्लॉट झोपडपट्टीत राहत असून लग्न समारंभात डेकोरेशनची कामे करतो. सलगर यांनी विवाह बाबत अडचण सांगितली. त्याप्रमाणे या विवाहाची जबाबदारी घेऊन ती पार पाडण्यात आली. तसेच, प्रशांत सलगर म्हणाले, लॉकडाउन दोन वेळा पुढे ढकलले गेल्याने दोन्ही कुटुंबातील घरची मंडळी चिंताग्रस्त झाली होती. मात्र, गणेश शेरला यांच्या प्रयत्नातून हे लग्न पार पडले.