पुणे :- ऍथलेटिक्सच्या स्पर्धांमध्ये नेहमी भाग घेणाऱ्या क्रीडापटूंना धावपटूंमधील भीष्माचार्य डॉ. जॅक डॅनियल आणि ऑलिंपिकपटू रायन हॉल यांच्यासोबत दहा तसेच एकवीस किलोमीटरच्या स्पर्धेत धावण्याची संधी… कधीतरी धावण्याचा व्यायाम घेणाऱ्यांपासून ते फक्त मॉर्निंग वॉकपुरताच व्यायाम करणाऱ्यांपर्यंतच्या इतरांना कुटुंबासमवेत सहा किलोमीटरच्या टप्प्यात चालण्याचा-धावण्याचा आनंद घेण्याचा योग. अशी दुहेरी धमाल येत्या रविवारी, ९ डिसेंबरला होणाऱ्या “बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन’मध्ये होणार आहे.
या स्पर्धेचे मुख्य समन्वयक आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली. “पुणेकरांची तंदुरूस्ती’ (वेलनेस) या कल्पनेतून या हाफ मॅरेथॉनची कल्पना पुढे आली.
ही स्पर्धा ९ डिसेंबरच्या पहाटे म्हाळुंगे-बालेवाडी संकुलापासून सुरू होईल. सुरुवातीला २१ आणि १० किलोमीटरच्या टप्प्यासाठीची शर्यत पहाटे पाच वाजता सोडण्यात येईल. त्यावेळी अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित असतील. ढोल-ताशाच्या दणदणाटात या स्पर्धेची शानदार सुरूवात होईल. तसेच लष्कर आणि पोलिसांचा बँड हेही या उद्घाटन सोहळ्याचे आकर्षण असेल.
पहिल्या दोन टप्प्यांतील शर्यत सुरू झाल्यानंतर काही वेळातच सहा किलोमीटरचा तिसरा टप्पा सुरू होईल. पुणेकरांना त्यात आपल्या कुटुंबासमवेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेचे ब्रँड अँबेसेडर रॉयन हॉल, त्यांच्या पत्नी आणि अमेरिकेतील प्रसिद्ध धावपटू सारा आणि मंदिरा बेदी यांची उपस्थिती त्यावेळी असेल. बेदी या मॅरेथॉनचे सूत्रसंचालन करतील. तसेच अनेक नाट्य-चित्र अभिनेते, नामवंत व्यक्तींबरोबर चालण्याची-धावण्याची संधी पुणेकरांना मिळेल. “ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया’ (एएफआय) आणि “एआयएमएस’ (एम्स) यांची या स्पर्धेला मान्यता मिळालेली आहे.
या अर्धमॅरेथॉन स्पर्धेत यशस्वी ठरणाऱ्या स्पर्धकांसाठी एकूण साडेएकवीस लाख रूपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
“तंदुरूस्ती’ (वेलनेस) या मध्यवर्ती संकल्पनेला उत्तेजन देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी, मान्यवर, नागरिक, विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. प्रत्येकाला त्यात सहभागी होता यावे, यासाठी पोलिस दलाने तसेच महापालिकेच्या प्रशासनाने त्याचे नियोजन केले आहे.
या स्पर्धेत पोलिस धावपटूंसाठी स्वतंत्रपणे पोलिस आयुक्त चषक जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यभरातील पोलिसांनी मोठ्या संख्येने नोंदणी केली आहे.
पुणेकरांच्या सेवेत तत्पर असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची विशेष दखल या स्पर्धेत घेण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांसाठी महापौर चषकाची घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी केली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा मॅरेथॉनमधील सहभाग हे या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य ठरेल. मॅरेथॉनमध्ये असे चषकही पहिल्यांदाच ठेवण्यात आले आहेत.
प्रशिक्षण सत्राला भरभरून प्रतिसाद
हाफ मॅरेथॉनच्या प्रशिक्षण सत्राला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने पुणे शहराने “देशातील सर्वात फिट शहर’ हा लौकिक कायम राखला. बजाज अलियांझ पीएचएम ही देशातील एकमेव लांब पल्ल्याची शर्यत असून त्यामध्ये सहभागींना कस्टमाईज्ड प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम “रन स्मार्ट’ प्रकल्पातील जगातील सर्वोत्तम प्रशिक्षक डॉ. जॅक डॅनियल यांनी आखला आहे.
या स्पर्धेतील या तीनही टप्प्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. नोंदणीच्या अखेरच्या वेळेपर्यंत ही नोंदणी होत होती. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, महापालिकेचे कर्मचारी, विविध क्षेत्रांत काम करणारे अधिकारी-कर्मचारी आदी या स्पर्धेत सहभागी होत आहेतच, पण त्याचबरोबर अनेक कुटुंबे तसेच सोसायट्यांमधील नागरिक, हास्य क्लब, ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. लष्कराचे अधिकारी आणि जवानही या स्पर्धेत सहभागी होताना दिसणार आहेत.
असा असेल मार्ग…
सहा किलोमीटरच्या फॅमिली रनसाठी
सुरूवात म्हाळुंगे-बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुलापासून. राधा चौक, बालेवाडी फाटा, हाय स्ट्रीट. त्याला वळसा घालून पुन्हा क्रीडा संकुलात परत.
—
दहा किलोमीटरच्या स्पर्धेसाठी मार्ग
सुरूवात म्हाळुंगे-बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुलापासून. राधा चौक, बालेवाडी फाटा, बाणेर रस्ता, व्हेरिटास चौकातून पुन्हा याच मार्गाने क्रीडा संकुलात परत.
—
एकवीस किलोमीटरच्या स्पर्धेसाठी मार्ग
सुरूवात म्हाळुंगे-बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुलापासून. राधा चौक, बालेवाडी फाटा, बाणेर रस्ता, व्हेरिटास चौक, विद्यापीठ चौक, तेथून वळून औंध रस्त्याने ब्रेमेन चौकात. तेथून औंधच्या परिहार चौकातून आयटीआयमार्गे पुन्हा बाणेर फाटा. बाणेर रस्त्याने क्रीडा संकुलात परत.