पुणे : आदिवासी भागातील महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. पालघर, भीमाशंकर आणि गडचिरोलीतील आदिवासी गावांसाठी स्वच्छता, सामाजिक विकास आणि जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आदिवासी महिलांसाठी मधमाशी पालन प्रशिक्षण व साहाय्य हा त्यातील एक उपक्रम आहे.
मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आणि फिक्की फ्लो दिल्लीच्या ऍग्रीकल्चर अँड फार्मिंगच्या राष्ट्रीय प्रमुख रितू प्रकाश छाब्रिया यांच्या नेतृत्वात फिक्की फ्लो मुंबई चॅप्टर, फिक्की फ्लो पुणे चॅप्टर, रोटरी क्लब ऑफ मुंबई सोबो या समविचारी संस्थांच्या सहकार्याने पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील आदिवासी महिलांसाठी मधमाशी पालन उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने मधमाशी पालन व्यवसायासाठी १० दिवसांचे प्रशिक्षण व ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे. मोखाडा गटातील वाघ्याची वाडी गावातील एकूण ४७ महिलांना या उपक्रमाचा लाभ मिळाला. महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग महामंडळाचे श्री चौधरी, रोटरी मुंबईचे अध्यक्ष राजीव पूनातर, राकेश जव्हेरी, मुकुल माधव फाऊंडेशनचे बबलू मोकळे आदी टीम उपस्थित होती.
रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “फिनोलेक्स व मुकुल माधव फाऊंडेशन ग्रामीण व शहरी भागात सामाजिक उपक्रम राबवून तळागाळातील लोकांसाठी काम करत आहे. खेड्यांना स्वावलंबी व सक्षम बनविण्यासाठी शाश्वत विकासाचे उपक्रम राबविले जातात. खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशनसोबत २०१७ पासून फाऊंडेशन दुर्गम भागातील गावांमध्ये प्रत्येक घरात स्वच्छतागृह बांधणे, शिक्षण, वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्य राखणे, परिसर स्वच्छता राखणे आदी उपक्रम राबवत आहे. आजवर पालघर जिल्ह्यातील १३ गावांसाठी व गडचिरोली जिल्ह्यातील आठ गावांना १०३८ स्वच्छतागृह बांधून देण्यात आली आहेत. ही स्वच्छतागृहे घरातील महिलेच्या नावाने आहेत. सौर दिवे, सौर पंप बसविण्यात आले आहेत. हिंदुजा फाउंडेशनच्या मदतीने तीन गावांमध्ये पाणी संवर्धन प्रकल्प उभारण्यात आले आहेत.”
लॉकडाऊन काळात पालघर मध्ये स्थलांतरित झालेल्या अनेकांचे खेरवाडी सोशल वेलफेअर असोसिएशन अंतर्गत शेतीचे प्रशिक्षण, बी-बियाणे, खत, भाज्या व फळांची रोपे देऊन पुनर्वसन करण्यात आले. प्रशिक्षण ‘सिस्टीम ऑफ राईस इंटेंसिफिकेशन’ पद्धतीने देण्यात आल्याने कमी कच्चामालात अधिक उत्पादन मिळाले. आता हे १५० स्थलांतरित आपापल्या गावी जाऊन शेती करत असून आधीपेक्षा अधिक पैसा कमवत आहेत. जी. पी. इको सोल्युशन्स सोबत सोनाळे व शेले गावांना ४० रस्त्यावरील सौर दिवे दिले.
