अतुल किर्लोस्कर यांना ‘जीवनगौरव’; खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी वितरणडॉ. अरविंद नातू, संदीप कर्णिक, राहुल देशपांडे, नीता मेहता आदींचा होणार सन्मान
पुणे : टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियमतर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उद्योजक अतुल किर्लोस्कर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’, तर प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे (कला व साहित्य), टेक्नोक्रॅट आनंद शिराळकर (युवा उद्योजक), पॉवरलिफ्टर नीता मेहता (क्रीडा), ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. अरविंद नातू (विज्ञान व तंत्रज्ञान), जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके (सार्वजनिक आरोग्य), पुण्याचे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक व भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे संचालक संतोष ढोके (प्रशासन) यांना सन्मानित केले जाणार आहे.
सिक्कीमचे माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते ‘अवार्ड्स फॉर एक्सलन्स २०२२’चे वितरण होणार आहे. शुक्रवार, दि. १३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता हॉटेल रॅडिसन ब्ल्यू, नगर बायपास, खराडी पुणे येथे हा पुरस्कार समारंभ होईल. याप्रसंगी सिम्बायोसिस चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, टीएमसी’चे अध्यक्ष अश्विनी मल्होत्रा उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ‘टीएमसी’चे महासचिव डॉ. जयसिंग पाटील यांनी दिली आहे.