पुणे : दिवाण हाऊसिंग फायनान्स लि.(डीएचएफएल) या कंपनीशी संबंधित बँक घोटाळा प्रकरणी या पूर्वीच पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना अटक झाली आहे. आज त्यांचे हेलिकॉप्टरही सीबीआयने जप्त केले आहे.
भोसले यांना 26 मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना 10 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने भोसले यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांचे खासगी हेलिकॉप्टर जप्त करण्यात आले आहे.
भोसले यांच्या घरावर एप्रिल महिन्यातच सीबीआयने छापे घातले होते. तर मागील वर्षी “सीबीआय’ने त्यांची तब्बल 40.34 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. मागील काही वर्षांपासून येस बॅंक व डीएचएफएल प्रकरणाचा तपास “सीबीआय’कडून सुरु आहे. त्यांनी यापुर्वी उद्योजक संजय छाब्रिया यांना अटक केली आहे, तर विनोद गोएंका व शाहीद बलवा यांच्यावरही कारवाई केली आहे.
दरम्यान, याच बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये भोसले यांचेही नाव पुढे आले होते. त्यानुसार, “सीबीआय’कडून भोसले यांचा तपास सुरु होता. भोसले यांचे घर व काही मालमत्तांवर एप्रिल महिन्यात “सीबीआय’ने छापे टाकून काही मोठ्या प्रमाणात झाडाझडती घेतली होती. त्याचवेळी त्यांच्या मालमत्तांमधून महत्वाची कागदपत्रेही त्यांनी जप्त केली होती.