पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक उपाध्यक्ष आनंद शेजवळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत करुन भाजपचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे महापालिकेत भाजपाचे सभागृह नेते गणेश बिडकर, माजी नगरसेविका कल्पना बहिरट, लक्ष्मी ताई घोडके, भाजपा कोथरूड मंडल पुनित जोशी, पुणे शहर युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रणय शिंदे, निलेश आलाट, वैशाली सोनवणे, विशाल दरेकर, विशाल कोंडे, सुजीत पुजारी, सागर अफुवाले, कौस्तुभ दबडगे, सतिश गायकवाड, पोपटराव गायकवाड, सुवर्णा भरेकर, बाळासाहेब घोडके, उद्धव मराठे आदी उपस्थित होते.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फोडाफोडीलाही वेग आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का द्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या दोन प्रमुख कार्यकर्त्यांनी गणेश बिडकर यांच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
या वेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम असल्याचं मला सांगण्यात आलं. एखाद्या हॉलमध्ये कार्यक्रम असेल आणि 50 लोक असतील असं मला वाटलं होत. पण संख्या बघून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली असं वाटू लागलं आहे. गणेश बीडकर आणि भाजपच्या प्रेमापोटी एवढ्या मोठ्या संख्येने हे लोक आले आहेत. हा प्रवेशाचा मोठा कार्यक्रम होतोय. दोन तरुण कार्यकर्त्यांना लवकर कळालं की राजकीय पक्षात काम करायचं असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही.या वेळी चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राष्ट्रवादी हा केवळ एका माणसाचा पक्ष आहे. त्यांनी सांगितलं की रांगेत बसायचं. पक्षाचा प्रमुख देईल ते त्यांच्याकडून घ्यायचं. त्यांनी आयुष्य घालवलं पक्ष उभं करायला त्यामुळं त्यांचं ऐकल तर चालेल. पण आता हा पक्ष एका कुटुंबाचा पक्ष बनला आहे आता त्यांच्या कन्या खूप तापट आहे. त्या म्हणतात हा माझ्या वडिलांचा पक्ष आहे.