पुणे : खासगी सहभागातून (पीपीपी मॉडेल) आणि डेव्हलपमेट क्रेडीट नोटच्या मोबदल्यात शहरातील बारा रस्ते आणि दोन उड्डापूलाचे कामे करण्याच्या प्रस्तावास मंगळवारी स्थायी समितींच्या बैठकीत एकमताने मान्यता देण्यात आली. या कामांसाठी सल्लागार एजन्सीची नेमणूकिस मान्यता देण्यात आली आहे. क्रेडीट नोटच्या मोबदल्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच शहरातील रस्ते विकसित करण्यात येणार आहे.आवश्यकते नुसार आणि भविष्यात पीपीपी मॉडेलनुसार क्रेडीट नोटच्या बदल्यात रस्ते व उड्डाणपूल विकसित करण्याची तयारी कोणी दर्शविल्यास त्यासही मान्यता देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
राज्य सरकारकडून जुन्या हद्दीचा विकास आराखड्यास मंजूरी देताना विकास नियंत्रण नियमावलीत क्रेडीट नोटचा वापर करून त्यामोबदल्यात विकास कामे करण्यासंदर्भातील तरतूद करण्यात आली होती. त्याचा आधार घेत चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात पीपीपी मॉडेल आणि क्रेडीट नोटच्या मोबदल्यास शहरातील 23 रस्ते विकास करण्यासंदर्भात तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी स्थायी समिती समोर हा प्रस्ताव सादर केला होता. या रस्त्यांच्या कामासाठी सुमारे 581 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. हे रस्ते विकसित करण्याच्या बदल्यात संबंधितांना महापालिकेकडून तेवढ्या किंमतीची क्रेडीट नोट दिली जाणार आहे.
यासंदर्भात रासने म्हणाले,”” यापूर्वी 2011-12 मध्ये 11 किलोमीटर लांबीच्या रस्ते महापालिकेकडून या माध्यमातून विकसित करण्यात आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून देखील या मॉडेलाचा वापर करून विकास कामे केली जात आहे. यातून शहराच्या विकासाला गती मिळणार आहे.” तर बिडकर म्हणाले,”” शहर विकासाच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. रस्त्यांची निवड हि महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या रस्त्यांच्या कामाचे इस्टिमेट, देखभाल-दुरूस्तीपासूनची जबाबदारी ही सल्लागार कंपनीवर राहणार आहे.”
या योजनेचे फायदे काय?
-महापालिकेस थेट आर्थिक गुंतवणूक करावी लागणार नाही.
– रस्त्यासाठी भूसंपादनाच्या कामाला गती मिळणार
-रस्ते विकासित होणाऱ्या भागात विकासाला चालना मिळणार
-अन्य आरक्षणे विकासनास मदत होणार
-रस्ता आरक्षणाच्या जागेवर होणारे अनधिकृत बांधकामांना आळा बसणार
-विकास आराखड्याची अंमलबजावणी होण्यास मदत होणार
रस्ते निवडण्याचे निकष काय?
-रस्ते हे दोन भागांना जोडणारे लिंक रस्ते असावेत.
-रस्त्यांची रूंदी किमान 18 मीटर असावी.
– तडजोडीने जागा ताब्यात येतील अशाच रस्त्यांची प्राधान्याने निवड
– व्यापारीकरण, आयटी पार्क तसेच टाऊनशिप विकसित होऊ शकले अशाच रस्त्यांना प्राधान्य
डेव्हलपमेन्ट क्रेडीट नोट म्हणजे काय?
-रस्ते विकास बिलाऐवजी तेवढ्या रकमेची क्रेडीट नोट देणार
-ती टप्याटप्प्याने देण्याची सुविधा
-जमीन विकासन शुल्क, पेड एफएसआय शुल्क, आयटी प्रिमिअम शुल्क भरण्यासाठी या क्रेडीट नोटचा वापर करता येणार
-तसेच विविध प्रकाराचे महापालिकेचे शुल्कासाठी वापरता येणार
-एका आर्थिक वर्षात जास्त जास्त 200 कोटीची मर्यादा
-पाच वर्षापर्यंत क्रेडीट नोट वापरता येणार
पीपीपी तत्वावर अन्य रस्ते विकसनास विकसक पुढे आल्यास स्वागतच – गणेश बिडकर, सभागृहनेता
शहराचा विकास जलदगतीने व्हावा यासाठी पुणे महापालिकेने यापुर्वीही पीपीपी तत्वावर रस्ते विकसित केले आहेत. त्याच धर्तीवर नवीन युनिफाईड विकास नियंत्रण नियमावलीनुसार क्रेडीट बॉंडचा वापर करून पीपीपी तत्वावर रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. पीपीपी तत्वावरील रस्ते विकसित करण्याच्या धोरणाला सर्वसाधारण सभेने यापुर्वीच मंजुरी दिली आहे. आजही स्थायी समितीमध्ये एकमताने प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हे चार रस्ते व दोन पूलच नव्हे तर या धोरणानुसार शहरातील अन्य भागातील डीपी रस्ते व उड्डाणपुलांचाही विकास करण्यात येईल. यासाठी कोणी विकसक पुढे आल्यास त्याचे स्वागतच आहे.असे सभागृहनेते गणेश बिडकर यांनी स्पष्ट केले आहे.
पीपीपी तत्वावर विकसित करण्यात येणारे रस्ते
पॅकेज १ – खराडी स.नं. ३,४,७ येथील १८ मी. डीपी रस्ता (रेडीसन हॉटेल) ते खराडी स.नं. ६० येथील ३६ मी. डी.पी रस्ता ,खराडी स.नं. ३९,४१,५९ येथील २४ मी. डीपी रस्ता ते खराडी येथील १८ मी. व ३६ मी. डीपी रस्ता विकसित करणे. खराडी येथील स.नं.५९ ,६० येथील १८ मी. डीपी रस्ता ते २४ मी. डीपी रस्ता ते खराडी रामारामनगर येथील १८ मी. व ३६ मी. डीपी उर्वरीत रस्ता विकसित करणे. खराडी येथील स.नं. ४, ४०, ४१ येथील १८ मी. डीपी रस्ता ते खराडी स.नं. ४० येथील १८ मी. ते २४ मी. डीपी रस्ता विकसित करणे. खराडी येथील स.नं. ३९, ४१, ४२ आणि ४३ येथील २४ मी. डीपी रस्ता ते २४ मी डी.पी.रस्ता (कोलते पाटील बिल्डिंग) ते खराडी दर्गा येथील २४ मी. डीपी रस्ता विकसित करणे. खराडी येथील स.नं. ६७, ६८, ६९ येथील ३० मी. डीपी रस्ता ते खराडी येथील ३० मी. डीपी रस्ता ते खराडी हुलाजी नगर पाचपीर चौक येथील ३० मी वाघोली रोड नदीजवळील रस्ता महापालिका हद्दीपर्यंत विकसित करणे. (१२८ कोटी रुपये खर्च)
पॅकेज २ – नाला नं. १ ते साडेसतरानळी येथील २४ मी. डीपी रस्ता विकसित करणे. अमनोरा पार्क टाउनशिप ते केशवनगर ते माळवाडी रस्ता येथील प्रस्तावित अंडरपास १८ मी. डी.पी. रस्ता विकसित करणे. (४५ कोटी रुपये खर्च)
पॅकेज ३ – मुंढवा येथील नदीकाठचा रस्ता मुंढवा ते बंडगार्डन पर्यत ३०. मी. डी.पी. रस्ता विकसित करणे, २१ मी. रुंद व ३ कि.मी.चा उड्डाणपुल बांधणे. साधारण ५.५० कि.मी. (३६८ कोटी रुपये खर्च)
पॅकेज ४ – मुंढवा येथील स.नं. ९ ते १४ व खराडी स.नं.१६/४ अ या दरम्यान मुळा – मुठा नदीवर २४ मी. रुंदीचा पूल बांधणे. श्र्४० (४० कोट रुपये खर्च)