गुरूदक्षिणेच्या जमवलेल्या निधीतून विविध संस्थाना ‘लाख’मोलाची मदत
पुणे : पं.रोहिणीताई भाटे यांचा वारसा जोपासत नृत्यभारती कथक डान्स अॅकॅडमीच्या विविध शाखेतील शिष्या दरवर्षी एकत्रित येऊन स्वरचित नृत्यरचना गुरुदक्षिणा म्हणून गुरूला अर्पण करतात. गुरुपौर्णिमेनिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमाविषयी ‘नृत्यभारती’च्या सर्व शिष्यांमध्येही
प्रचंड उत्सुकता असते.
परंतु, सद्य:स्थिती पाहता, गेली ७२ वर्षे अव्याहतपणे जपली जाणारी ही प्रथा एकत्रितपणे राबविण्यास मर्यादा आल्या आहेत. प्रथेत खंड न पाडता वेगळ्या स्वरूपात हा कार्यक्रम घेण्याचे संस्थेने योजिले आहे. तरी दरवर्षीप्रमाणे गुरुदक्षिणेचा निधी संस्थेने जमा केला. हा निधी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अडचणीत आलेल्या विविध घटकांना मदत करणाऱ्या सामाजिक संस्थांना दिला. गुरु-शिष्य परंपरेतील चार पिढ्यांनी स्वयंस्फूर्तीने यात सहभाग घेतला. त्यांच्या समन्वयातून एक लाखाहून अधिक रुपयांचा निधी संकलित झाला. तो निधी नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्यदिनाच्या औचित्यावर ‘खाना बचाव, खाना खिलाओ ‘, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती ‘, ‘ झाशीची राणी प्रतिष्ठान ‘ आणि ‘ आय टीच स्कूल’ या सामाजिक संस्थांना सुपूर्त करण्यात आला. चॅरिटेबल ट्रस्ट असून देखील केलेल्या या लाखमोलाच्या कार्यातून वेगळा आदर्शच नृत्यभारतीने समाजापुढे घालून दिला.
या उपक्रमाविषयी संस्थेच्या संचालिका तसेच पं. रोहिणीताई भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या नीलिमा अध्ये यांनी सांगितले की, “ही संकल्पना आम्ही शिष्यांपुढे मांडल्यानंतर सर्वांचा त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे नवोदित आणि बाल नृत्यांगना यांनी देखील आपले खाऊचे पैसे या उपक्रमासाठी स्वखुशीने दिले. अमुक एका रकमेचे बंधन आम्ही घातले नाही. शक्य तेवढी जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन केले. यामुळे एक ठोस रक्कम आम्ही जमा करू शकलो, याचे समाधान वाटते.
गुरु रोहिणीताई या कलाकार म्हणून जितक्या श्रेष्ठ होत्या, तितक्याच माणूस म्हणूनही वंदनीय होत्या. त्यांनी अनेकदा आपल्या कार्यातून सामाजिक दायित्वाचे दर्शन घडविले होते. त्यामुळे हा उपक्रम म्हणजे त्यांना विनम्र भावनेने अर्पण केलेली गुरुदक्षिणाच आहे, अशा भावनाही अध्ये यांनी व्यक्त केल्या.