पुणे : नृत्यभारती कथक डान्स अकॅडमीचा ७२ वा वर्धापनदिन तसेच गुरुपौर्णिमा उत्सव असे दुहेरी औचित्य साधून येत्या २ तारखेला ‘अनुबद्ध’ या कथक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सायंकाळी ६.३० ते रात्री १० या दरम्यान ही मैफल रंगेल. संस्थेच्या विविध शाखांमधील निपुण नर्तकींचा नृत्यविष्कार एकाच व्यासपीठावर अनुभवण्याची संधी यानिमित्ताने रसिक पुणेकरांना लाभेल. पं. रोहिणीताई भाटे यांनी रचलेली अनोखी संरचना ‘कठपुटली ‘ हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असेल.
पं. रोहिणीताई भाटे यांच्या नृत्याविष्काराचा वारसा नृत्यभारती संस्था गेली ७१ वर्षे अव्याहतपणे जपत आहेे. ‘अनुबद्ध’ मैफल म्हणजे या अथक मेहनतीचे मूर्त रूप असून याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी म्हणजे पुणेकरांसाठी पर्वणी ठरेल, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
गुरु पं.रोहिणीताई भाटे यांच्या स्मरणार्थ संस्थेच्या विविध शाखांकडून कथक मैफलीचे आयोजन करण्यात येते. यात ‘मति अमित गति ललित’, ‘संचित आणि सृजन’, ‘आवर्तन’, ‘अनुग्रह’, ‘अनाहत’ ‘एकल विधा’, ‘उजवी बाजू’ आदी मैफलींना रसिक प्रेक्षकांची भरभरून दाद लाभते. तसेच या माध्यमातून कलाकारांना हक्काचे व्यासपीठही उपलब्ध होते.