पुणे- आगामी नवरात्री आणि दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खरेदीसाठी वेळ मिळावा, तसेच दुकानदारांना देखील पुरेसा वेळ मिळावा यासाठी शासनाने दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन्स पुणे (पुणे व्यापारी महासंघ) यांच्यातर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या अधिक मास सुरु आहे. या महिन्यात सौभाग्याचे वाण खरेदी करण्याला पसंती दिली जाते. दागिने, भांडी, पूजेचे साहित्य नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.
17 ऑक्टोबर पासून हिंदू बांधवांचे नवरात्री आणि दिवाळी हे सण सुरु होत आहेत. या उत्सवात खरेदी होत असल्याने खरेदी-विक्री देखील मोठ्या प्रमाणात होते.
दिवाळी नंतर लगेच लग्न सराई सुरु होत आहे. त्यासाठी देखील खरेदीची अनेकांची लगभग सुरु असते. सध्या दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास शासनाची परवानगी आहे.
शहरातील नोकरवर्ग कामावरून घरी आल्यानंतर त्यांना खरेदीसाठी फार कमी वेळ मिळतो. अनेकदा दुकाने बंद झाल्याने ग्राहकांना रिकाम्या हाताने परत जावे लागते.
राज्य सरकारने हॉटेल्स आणि बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. त्याच प्रमाणे दुकानांना देखील 17 ऑक्टोबर पासून रात्री नऊ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.